गडचिरोली, दि. २२ :
नगरपरिषद निवडणुकीची सुगंधी चाहूल लागताच गडचिरोलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज काँग्रेसला असा मोठा धक्का बसला आहे की ज्याने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते अतुल मल्लेलवार, अमित संगीडवार यांच्यासह डझनभर वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.या मोठ्या घडामोडीला स्थानिक राजकारणात ‘मोठा भूचाल’ असेच संबोधले जात आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश…
राज्याचे महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते.
याच कार्यक्रमात चामोर्शी रोडवरील भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.याच व्यासपीठावर प्रभावी युवा नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
या वेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की “गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपची लाट आणखी मजबूत झाली आहे. जनता परिवर्तनासाठी तयार आहे, आणि हा बदल आता स्पष्टपणे दिसत आहे.”मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक असताना काँग्रेसमधील ही मोठी गळती पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
काँग्रेसच्या स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की,स्थानिक नेतृत्वाकडून होणारी उपेक्षा, मनोमिलनाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष ही गळतीची प्रमुख कारणे आहेत.
अतुल मल्लेलवारांचा प्रवेश — काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का…
अतुल मल्लेलवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांचे पुत्र असून युवक काँग्रेसमध्ये ते अनेक वर्षांपासून सक्रिय व प्रभावी नेतृत्व करत होते.
युवा वर्गात त्यांची मजबूत पकड, संघटन कौशल्य आणि लोकप्रियता लक्षात घेता ते काँग्रेसचे महत्त्वाचे चेहरा होते. त्यांच्यासह अनुभवी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये धाव घेतल्याने काँग्रेसची स्थानिक रणनीती पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.
शहरभर सध्या एकच चर्चा—
“गडचिरोलीतली निवडणूक आता नव्या वळणावर आली आहे!”
• काँग्रेसमध्ये मोठी गळती
• भाजपचा वाढता उत्साह
• मंत्री बावनकुळे यांचा थेट हस्तक्षेप
• प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन
या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद निवडणुकीची दिशा आणि समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.




