गडचिरोली, दि. २८ एप्रिल:
गडचिरोली जिल्ह्याचे ज्येष्ठ, प्रतिष्ठित आणि सेवाभावी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्राने एक समर्पित, निस्वार्थी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
डॉ. कुंभारे हे गडचिरोलीतील जनतेसाठी केवळ डॉक्टर नव्हते, तर ‘गरिबांचे धन्वंतरी’ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर हजारो गोरगरिब रुग्णांवर निःस्वार्थ भावनेतून उपचार केले. अनेकदा त्यांनी रुग्णांकडून कोणतीही फी न आकारता सेवा दिली, तर गरज भासल्यास आर्थिक मदतही केली. त्यांच्या दृष्टीने डॉक्टरी व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नव्हता, तर मानवसेवेचा ध्यास होता.
त्यांचा स्वभाव अत्यंत साधा, प्रेमळ आणि मनमिळावू होता. रुग्णांशी ते आत्मीयतेने संवाद साधत, त्यांच्या कुटुंबीय अडचणी समजून घेत आणि त्यांना मानसिक आधार देत. त्यामुळेच शासकीय रुग्णालयांनंतर नागरिकांचा सर्वाधिक विश्वास त्यांच्या ‘धन्वंतरी रुग्णालयावर’ होता.
डॉ. कुंभारे यांचे आध्यात्मिक जीवनही तितकेच समृद्ध होते. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गीताचार्य तुकाराम दादा यांच्या सानिध्यात राहिले होते. गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे ते सक्रिय प्रचारक होते. सेवा, त्याग आणि साधेपणा या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर अंगीकार केला.
ते इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. या पदावर असताना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
डॉ. कुंभारे यांनी कधीही संपत्तीचा मोह ठेवला नाही. दिवस-रात्र, कोणत्याही वेळी रुग्णसेवेसाठी ते तत्पर असत. मध्यरात्रीसुद्धा रुग्ण आल्यास ते त्वरित उपचारासाठी उपस्थित राहत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले.
त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. अनंत कुंभारे, सून, नातवंडे, पत्नी, दोन मुली व जावई असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा चामोर्शी रोडवरील धन्वंतरी रुग्णालय येथून निघणार असून कठाणी नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या चार दशकांपासून गडचिरोलीकरांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ. शिवनाथ कुंभारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…




