Home भ्रष्टाचार गडचिरोलीत दारू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? – पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाचे सावट! ...

गडचिरोलीत दारू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? – पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाचे सावट! सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल : “एसपी साहेब कारवाई करतील का?”

0
244

 

गडचिरोली :

चामोर्शी तालुक्यातील वालसरा गावात सत्ताधारी पक्षाशी संबंधित घरातून देशी दारूचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल तीन लाख रुपयांच्या दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली असली, तरी ही कारवाई पोलीस प्रशासनाकडून दडपण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे.

सदर घर हे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार योगिता भांडेकर यांच्या दिराचे असल्याचे समोर आले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिकच गाजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती जाणीवपूर्वक दडपण्यात आली. काही पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली कारवाई नोंदविण्याचे टाळले, तसेच माध्यमांसमोर “अशी कोणतीही कारवाई झाली नाही” असे सांगितले. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्षदर्शी माहिती देत या सगळ्या प्रकारावर प्रकाश टाकला.

पत्रकार आणि काही सामाजिक संघटनांनी तांत्रिक माहिती उघड केल्यानंतरच पोलीस प्रशासनावर दबाव येऊन कारवाई नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे समजते.

 

दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,“दारू प्रकरण लपविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी कारवाई करतील?”

त्यांच्या मते, दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात पोलीसच माहिती लपवतात, हे जनतेच्या विश्वासाला धक्का देणारे आहे.गडचिरोली जिल्हा हा मुख्यमंत्री यांच्या पालकत्वाखाली असलेला जिल्हा असून, येथे असे प्रकार घडणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

सत्ताधाऱ्यांकडून पोलीस यंत्रणेवर दबाव आणून कारवाई दडपण्याचा प्रयत्न झाला, ही बाब लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

या संपूर्ण प्रकरणात दारू साठा करणाऱ्या व्यक्तीवर आणि माहिती लपविणाऱ्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संघटना यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,“जर कारवाई झाली नाही, तर जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

 

स्थानिक सुजाण नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.“गावात दारूचा साठा होत असताना प्रशासन झोपेत आहे का? आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरच कारवाई का होते?”असा सवाल सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

गडचिरोलीतला हा प्रकार हा केवळ दारू प्रकरण नाही, तर प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.आता सर्वांचे लक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here