धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदीची मागणी…
गडचिरोली, दि. — कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे गडचिरोलीत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने शहरातील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, इतिहासाची मोडतोड करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यात आले असून हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. विशेष म्हणजे, संबंधित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. मात्र, या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणे ही बाब अधिक गंभीर असल्याची टीका काँग्रेसने केली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
काँग्रेसने प्रशासनाकडे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त व भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
या आंदोलनात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आदिवासी काँग्रेस राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंत राऊत यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी इशारा दिला की, महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.




