Home राजकीय गडचिरोलीत महात्मा गांधी प्रभाग पोटनिवडणुकीची रणधुमाळी; ‘आर्थिक ताकद’ ठरणार निर्णायक?

गडचिरोलीत महात्मा गांधी प्रभाग पोटनिवडणुकीची रणधुमाळी; ‘आर्थिक ताकद’ ठरणार निर्णायक?

0
329

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरातील महात्मा गांधी प्रभागात मागील महिन्यात भाजपचे निवडून आलेले नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती निधनानंतर आता पोटनिवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. त्यामुळे या प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुक्तेश्वर काटवे हे लोकांमध्ये मिसळून राहणारे, जनसंपर्कात मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी स्वतःच्या बळावर विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर ही जागा पुन्हा भाजपकडेच राखण्यासाठी पक्षाकडून जोरदार रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, गडचिरोली नगरपालिकेतील सध्याच्या राजकारणात आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांनाच यश मिळते, अशी चर्चा जोर धरत आहे. महात्मा गांधी प्रभागातील आगामी पोटनिवडणुकीतही ‘कोट्यवधींची ताकद’ असलेलाच उमेदवार मैदानात उतरेल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
भाजपकडून संभाव्य उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे पती व माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यांच्यासोबतच महात्मा गांधी प्रभागातील तेली मोहल्ला परिसरातील रवींद्र नैताम यांचाही नाव चर्चेत आहे. याशिवाय सुरेश भांडेकर यांचेही नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवारही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या ते तुलनेने कमकुवत असल्याने उमेदवारीबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाकडे अद्याप ठोस आणि प्रभावी उमेदवार पुढे आलेला नसल्याने पक्षासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महात्मा गांधी प्रभागातील पोटनिवडणूक ही केवळ राजकीयच नव्हे, तर आर्थिक ताकदीचीही लढत ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आगामी काळात कोण उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here