गडचिरोली, दि. २७ एप्रिल २०२६ :
गौमातेचे रक्षण व्हावे तसेच तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात आज गौरक्षकांनी एकत्र येत व्यापक आंदोलन छेडले. ‘गौ-सन्मान’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गौरक्षकांनी एकत्र येऊन गौमातेच्या संरक्षणाची शपथ घेतली आणि तालुका प्रशासनाला निवेदन सादर करत गौरक्षण कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
गडचिरोली शहरात या आंदोलनाचे नेतृत्व नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंभोरकर यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह शेकडो गौभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाची सुरुवात इंदिरा गांधी चौकातून करण्यात आली. येथे सर्व गौरक्षक एकत्र जमल्यानंतर हातात भगवे झेंडे, तसेच गौसंरक्षणाचे संदेश लिहिलेले फलक घेऊन भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालय परिसरात पोहोचली.
तहसील कार्यालयात गौरक्षकांच्या प्रतिनिधीमंडळाने तहसीलदार सागर कांबळे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात जिल्ह्यात वाढत असलेल्या गोतस्करी आणि गोहत्या प्रकरणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियमितपणे कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी गौमाता ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगत तिच्या संरक्षणासाठी कडक कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे गडचिरोली जिल्ह्यात गौसंरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर यावर ठोस कारवाई करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.




