“जातीय समीकरणाच्या आधारावर माझ्या कार्यावर प्रश्न उपस्थित करणे अन्यायकारक” — गीता हिंगे
गडचिरोली :
‘लोकशाही वार्ता’ या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील काही विधाने चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्या गीता हिंगे यांनी तीव्र खंडन केले आहे.
गीता हिंगे म्हणाल्या, “मला नगरपालिकेचे तिकीट मिळावे, हा माझा कोणताही आग्रह नाही. मी कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या नाहीत. मी गेली अनेक वर्ष ‘आधारविश्व फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. माझ्या कार्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी तळागाळातील लोकांशी संपर्कात नाही, असे विधान बातमीत करण्यात आले, मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात — मुरंगल, कोयर, मलमपुडूर, कुर्ता अशा नक्षलप्रभावित गावांमध्ये जाऊन मदतकार्य केले आहे. पूरपरिस्थितीत व आपत्ती काळात गरजूंपर्यंत पोहोचले. हे राजकारणासाठी नव्हते, तर माणुसकीच्या नात्याने केले.”
गीता हिंगे यांनी आणखी सांगितले, “आधारविश्व फाऊंडेशनतर्फे आम्ही कोरोना काळात अनेक कुटुंबांना अन्नसाहित्य, टिफिन सेवा, तसेच अपंग विद्यार्थ्यांना तीन चाकी सायकली दिल्या. हे सर्व काम फाऊंडेशनच्या सदस्यांच्या स्वखर्चातून करण्यात आले आहे. शासनाकडून कोणतेही निधी किंवा आर्थिक मदत घेतलेली नाही.”
शेवटी त्यांनी म्हटले, “नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कोण व्हावे हे ठरविण्याचा अधिकार हा जनतेकडे आहे. जातीच्या राजकारणाला यामध्ये स्थान नसावे. समाजकार्य हेच माझं प्राधान्य आहे, आणि मी तेच प्रामाणिकपणे करत राहीन.”




