देसाईगंज : आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनकल्याण यात्रेला देसाईगंज येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहराच्या इतिहासात इतकी मोठी सभा यापूर्वी कधीच झालेली नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. या सभेला तब्बल २० हजारांहून अधिक नागरिकांचा जनसागर उसळला होता.
याच भव्य सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, सिरोंचाचे नेते बानय्या जंगम, तसेच ज्येष्ठ नेते मोहन पुराम यांच्यासह विविध पक्षातील शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
सभेत बोलताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असून ती बहिणींसाठी आशेचा किरण ठरत आहे. शेतकरी, ओबीसी समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. १९९१ साली निवडून आल्यापासून मी देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले, ज्यामुळे लोकांना प्रमाणपत्रांसाठी गडचिरोलीला धाव घ्यावी लागत नाही.”
ते पुढे म्हणाले, की “देसाईगंज शहरातील प्रॉपर्टी कार्ड प्रकरणे व पेसा कायद्याशी संबंधित अडचणी लवकरच मार्गी लावू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला सत्ता दिल्यास विकासाच्या अनेक योजनांचा वर्षाव करू. शहरातील भव्य नाट्यगृह माझ्याच प्रयत्नांतून मंजूर झाले असून झाडीपट्टी रंगभूमीला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे,” असे आश्वासन आत्राम यांनी दिले.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी पवार, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, तसेच डॉ. सोनल कोवे, नाना नाकाडे, लीलाधर भरडकर, संजय साळवे, युनूस शेख, रिंकू पापडकर आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार…
या सभेत आदिवासी विद्यार्थी संघातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि सदस्यांचा मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये नंदू नरोटे, मोहन पुराम, बानय्या जंगम, मदन वट्टी, दौलत कुमोटी, ऋषी हलामी, बाबुराव मडावी, शालिक मडावी, सरिता वट्टी, देवनाथ पारसे, राजू आत्राम, सुमन नैताम, दिलीप नैताम, रेश्मा कातेंगे, बाबुराव कुळसंगे आदींसह उत्तर आणि दक्षिण गडचिरोलीतील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.




