गडचिरोली, दि. १० जून : गडचिरोली शहरात कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले असून, अनेक व्यापारी, नागरिक तसेच काही शासकीय कर्मचारी आर्थिक व्यवहारांमध्ये फसवले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अमिर्झा येथील व्यापारी रफिक जब्बार कुरेशी यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
तक्रारीनुसार, गडचिरोली येथील मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज व्यवसायाशी संबंधित कमल राजेश मेघवानी, विनय राजेश मेघवानी आणि राजेश पाथुमल मेघवानी या तिघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. तक्रारदार रफिक कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ पासून व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध निर्माण झाल्यानंतर विश्वासाच्या नात्याचा फायदा घेत संबंधित व्यक्तींनी व्यवसायातील अडचणी आणि आर्थिक गरज असल्याचे सांगून वेळोवेळी लाखो रुपयांची रक्कम उधार घेतली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, बँक व्यवहार, ऑनलाइन हस्तांतरण तसेच विविध माध्यमांतून एकूण २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली होती. त्यातील काही रक्कम परत करण्यात आली असली तरी अंतिम हिशोबानुसार १३ लाख ६० हजार रुपये देणे बाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एचडीएफसी बँकेचा १३ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तांत्रिक कारण दर्शवून नामंजूर झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
त्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहते घर रिकामे करून गडचिरोली सोडल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारदाराने आपल्या अर्जात केला आहे. यामुळे सुरुवातीपासूनच फसवणूक करण्याचा हेतू होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कोट्यवधींच्या फसवणुकीची चर्चा…
या प्रकरणासंदर्भात शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, संबंधित आरोपींनी केवळ एका व्यक्तीची नव्हे तर अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, कथित फसवणुकीची रक्कम दहा कोटी रुपयांहून अधिक असू शकते. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
याशिवाय, ३० ते ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवले गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तथापि, या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘मोठ्या लोकांच्या संरक्षणामुळे आरोपी फरार?’
नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर काही सूत्रांनी असा दावा केला आहे की, संबंधित आरोपींना काही प्रभावशाली व्यक्तींचे संरक्षण मिळाल्यामुळे ते गडचिरोलीतून पसार होण्यात यशस्वी झाले. काहींनी आर्थिक व्यवहारांमध्ये “चिरीमिरी” आणि प्रभावाचा वापर झाल्याचाही आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, तक्रारदाराने लेखी तक्रार सादर केल्यानंतरही संबंधित आरोपींविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे तक्रारदारांसह इतर कथित पीडितांमध्ये निराशा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर आर्थिक फसवणुकीसंदर्भातील तक्रारी असूनही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखा किंवा वरिष्ठ पातळीवरील विशेष तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता विविध स्तरांतून पुढे येत आहे.
या कथित फसवणूक प्रकरणामागील सत्य काय आहे, किती लोकांना आर्थिक फटका बसला आहे, तक्रारींवर पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे आणि संबंधित आरोपी सध्या नेमके कुठे आहेत, याबाबतची माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष आता पोलीस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.




