Home ब्रेकिंग न्यूज ८ तासांत दोन गोवंश तस्करीच्या गाड्या पकडल्या; गोरक्षकांनी जीवाची बाजी लावत वाचवली...

८ तासांत दोन गोवंश तस्करीच्या गाड्या पकडल्या; गोरक्षकांनी जीवाची बाजी लावत वाचवली १२ जनावरे, ५ आरोपी ताब्यात.

0
597

 

गडचिरोली, ता. २८ :

जिल्ह्यातील गोवंश तस्करीचे प्रकार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. अवघ्या आठ तासांच्या कालावधीत गडचिरोली परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गोवंशाने भरलेल्या दोन गाड्या गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आल्या. या कारवाईत एकूण १२ जनावरे वाचविण्यात आली असून ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

 

गडचिरोली जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना वारंवार घडत असून, या घटनांनंतरही आरोपींना अल्पावधीतच जामिनावर सुटका मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि गोरक्षक संघटनांकडून पोलिस विभागाकडून होत असलेल्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री नवेगाव परिसरात एका जखमी गाईवर उपचार सुरू असताना चंद्रपूर रोडकडे जनावरे भरलेली एक मेटाडोर आणि एक बोलेरो पिकअप गाडी जात असल्याचे गोरक्षकांना दिसले. त्यांनी तत्काळ जीवाची पर्वा न करता या वाहनांचा पाठलाग केला. या दरम्यान मेटाडोर चालकाने गोरक्षकांवर गाडी चढविण्याचा प्रयत्न करत वेगाने पळ काढला, मात्र गोरक्षकांनी धाडस दाखवत बोलेरो वाहनाला थांबवण्यात यश मिळवले.

 

या बोलेरो गाडीतून ९ जनावरे जप्त करण्यात आली. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नगरपालिकेच्या कांजी हाऊस येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

घटनेला अवघे आठ तास उलटत नाही तोच, दुसऱ्या कारवाईत आणखी एक पिकअप वाहन पकडण्यात आले. या वाहनात ३ गोवंश जनावरे असल्याचे आढळले. या वेळी गाडी चालविणाऱ्या दोन आरोपींसह वाहनाला संरक्षण देणाऱ्या दुचाकीस्वारालाही पोलिसांनी अटक केली.

 

दोन्ही कारवायांमध्ये मिळून १२ जनावरे वाचवण्यात आली असून एकूण ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. गोरक्षकांच्या तत्परतेमुळे ही मोठी कारवाई शक्य झाली असली तरी, नागरिकांकडून आता पोलिस विभागाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. गोवंश तस्करीच्या गाड्या प्रत्येक वेळी गोरक्षकांच्या हस्ते पकडल्या जात असताना पोलिसांनी स्वतःहून कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

या घटनांनी जिल्ह्यातील गोवंश तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या अवैध कारवायांमागील मोठे रॅकेट उघडकीस आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here