Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीतील MPSC परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक प्रक्रियेवरून चर्चा; परीक्षा संपल्यानंतर घेण्यात आली हजेरी…? ...

गडचिरोलीतील MPSC परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक प्रक्रियेवरून चर्चा; परीक्षा संपल्यानंतर घेण्यात आली हजेरी…?  प्रशासनाकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही…

0
257

 

गडचिरोली, दि. १४ जून : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत रविवारी राज्यभर विविध परीक्षा केंद्रांवर स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. मात्र गडचिरोली शहरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी न करता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालय येथे MPSC परीक्षेचे केंद्र स्थापन करण्यात आले होते. आयोगाच्या नियमानुसार परीक्षार्थ्यांची ओळख पडताळणी व उपस्थिती नोंदविण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी बायोमेट्रिक प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र या केंद्रावर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी परीक्षा संपल्यानंतर घेण्यात आल्याचे निदर्शनास आले.

प्रत्यक्षदर्शी आणि काही परीक्षार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना सुरुवातीला बायोमेट्रिक पडताळणी न करताच परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर परीक्षा पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यात आली. या प्रकारामुळे काही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आयोगाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अनेक परीक्षार्थ्यांनी विचारणा केली की, जर परीक्षा सुरू होण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य असेल, तर संबंधित केंद्रावर ही प्रक्रिया नंतर का राबविण्यात आली? काही विद्यार्थ्यांनी यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी शासकीय विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख (सेंटर इन्चार्ज) अभय लाकडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, संबंधित केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्याचबरोबर उपलब्ध बायोमेट्रिक संचांची संख्या तुलनेने कमी होती. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे वेळेअभावी शक्य होत नव्हते.

लाकडे यांनी पुढे स्पष्ट केले की, या परिस्थितीची माहिती समन्वयकांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली होती. तसेच आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच परीक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी परीक्षा संपल्यानंतर घेण्यात आली. ही प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच राबविण्यात आली असून त्यामागे कोणताही गैरप्रकार किंवा नियमभंग करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात mpsc परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ईमेल द्वारे तक्रार सुद्धा केली आहे…

 

 

यापूर्वी परीक्षा केंद्रावरील एका जबाबदार अधिकाऱ्यानेही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याचे सांगितले होते.

या विषयाबाबत उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी MPSC परीक्षा ही त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत नसून ती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित केली जाते, असे स्पष्ट केले.

त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी हा विषय त्यांच्या कार्यक्षेत्रातील नसून याबाबत जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी, असे सांगितले.

याप्रकरणी अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, केंद्रप्रमुखांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही काही विद्यार्थी आणि पालकांकडून प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. आयोगाच्या नियमांचे पालन कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या परवानगीनंतर बदलण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

स्पर्धा परीक्षा या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असल्याने अशा प्रक्रियांबाबत कोणताही संभ्रम राहू नये, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणात परीक्षा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे परीक्षार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण घटनेमुळे स्पर्धा परीक्षांमधील प्रक्रिया, नियोजन आणि संसाधनांची उपलब्धता याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here