Home ब्रेकिंग न्यूज चामोर्शीत संतापाचा उद्रेक; अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ चक्काजाम, पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा,...

चामोर्शीत संतापाचा उद्रेक; अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ चक्काजाम, पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा, शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी नोंदविला निषेध…

0
183

 

 

चामोर्शी, दि. ११ जून २०२६ :

चामोर्शी येथे अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला असून या घटनेविरोधात गुरुवारी नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. हजारो नागरिकांनी एकत्र येत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडित बालिकेला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

 

घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी शहरात मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. हजारो वाहने अडकून पडल्याचे चित्र शहरात दिसून आले.

 

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. महिलांसह युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन या अमानुष कृत्याचा निषेध नोंदविला. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

या घटनेमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून “आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर?” असा सवाल अनेक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. निरागस बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीविरोधात तीव्र संतापाची भावना दिसून येत आहे.

 

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी शहरातील व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला योग्य ती शिक्षा मिळावी, अशी मागणी प्रशासन आणि राज्य शासनाकडे करण्यात आली.

 

चक्काजाम आंदोलन आणि पोलीस ठाण्यासमोरील वाढता जनक्षोभ लक्षात घेता पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल तसेच तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

 

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र या घटनेने चामोर्शीसह संपूर्ण परिसरात संताप, दुःख आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पीडित बालिकेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 

अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकतेची गरज असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. :::

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here