Home भ्रष्टाचार पाणीटंचाईने हैराण गडचिरोलीकर; मात्र अवैध दारू मुबलक, शहर ‘वाईनगंगा’ बनल्याची नागरिकांत चर्चा…?

पाणीटंचाईने हैराण गडचिरोलीकर; मात्र अवैध दारू मुबलक, शहर ‘वाईनगंगा’ बनल्याची नागरिकांत चर्चा…?

0
229

 

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर प्रत्येक वॉर्डात खुलेआम दारूविक्री; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…?

गडचिरोली : एकीकडे गडचिरोली शहरातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये अवैध दारूची विक्री मात्र राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता एक उपरोधिक चर्चा सुरू झाली असून, “शहरात पिण्याच्या पाण्यापेक्षा दारू अधिक सहज उपलब्ध आहे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे अनेक वॉर्डांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर किंवा इतर पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र याच काळात शहरातील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली शहरात कथितपणे ‘हप्तेखोरी’च्या जोरावर अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर काही दिवस पोलिसांकडून किरकोळ स्वरूपाच्या कारवाया होताना दिसल्या; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील जवळपास प्रत्येक वॉर्डात अवैध दारू विक्रेते सक्रिय असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. काही दारू विक्रेत्यांवर शेकडो गुन्हे दाखल असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, तरीही त्यांचा व्यवसाय सुरूच कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीला पोलिस विभागाच्या कार्यपद्धतीमुळे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत आहे का, असा सवालही आता उघडपणे विचारला जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरज प्रशासन पूर्ण करू शकत नसताना अवैध दारू मात्र कोणत्याही वेळी आणि कोणत्याही भागात सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे गडचिरोली शहराची ओळख आता काही भागांत ‘वाईनगंगा’ म्हणून होऊ लागल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. ज्या जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे, त्याच जिल्ह्यात अवैध दारूचा प्रवाह मात्र अखंड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे गडचिरोली हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकत्व असलेला जिल्हा आहे. याशिवाय जिल्ह्याला सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच पालक सचिव विकास खारगे यांसारखे वरिष्ठ प्रशासकीय मार्गदर्शक लाभलेले आहेत. तरीदेखील जिल्हाभरात अवैध दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचे आरोप होत असल्याने ही बाब प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्यासह विविध तालुका मुख्यालयांमध्ये अवैध, नकली व विषारी दारू उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अशा दारूमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे अवैध दारू व्यवसायामुळे शासनाच्या महसुलाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

यामुळे जिल्ह्यातील काही नागरिकांकडून दारूबंदी धोरणाच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही पुढे येत आहे. त्यांच्या मते, जर अवैध दारूवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होत नसेल, तर कायदेशीर व नियंत्रित पद्धतीने विक्रीला परवानगी देण्याचा पर्याय शासनाने विचारात घ्यावा. यामुळे शासनाला महसूल प्राप्त होईल, नागरिकांना निकृष्ट व विषारी दारूपासून संरक्षण मिळेल आणि अवैध व्यवसायालाही आळा बसू शकेल.

दरम्यान, पाणीटंचाई आणि अवैध दारूविक्री या दोन्ही गंभीर प्रश्नांमुळे गडचिरोलीकरांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांची मागणी आहे की, प्रशासनाने एकीकडे पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुधारावी आणि दुसरीकडे अवैध दारूविक्रीविरोधात कठोर, सातत्यपूर्ण व परिणामकारक कारवाई करून गडचिरोलीला ‘वाईनगंगा’ बनविणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here