Home आरोग्य ११ महिन्यांच्या वंशिकेच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी चौकशी अहवाल गायब; दोषींवर...

११ महिन्यांच्या वंशिकेच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी चौकशी अहवाल गायब; दोषींवर कारवाई होणार का? स्थानिक डॉक्टर आमदार वंशिकेला न्याय मिळवून देतील काय…?

0
92

 

गडचिरोली :

५ मार्च २०२६ रोजी गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या वंशिका लेनगुरे या निष्पाप बालिकेचा कथित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय, दिबना गावातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत घटनेची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात त्या वेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असताना रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती गठित करून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवत कुटुंबीयांनी वंशिकेचा अंतिम संस्कार केला.

मात्र, या घटनेला जवळपास दीड महिना उलटूनही चौकशी समितीचा अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकशी समितीचे सदस्य डॉ. प्रशांत आखाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “मी समितीचा सदस्य आहे, मात्र याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी समिती प्रमुख डॉ. बनसोड यांच्याशी संपर्क साधावा,” असे सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाळे तसेच महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधुरी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाची उदासीनता उघड होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे आधीच हळहळ व्यक्त होत असताना प्रशासनाने या प्रकरणाला अपेक्षित गांभीर्याने न घेतल्याचा आरोप आता जोर धरत आहे. दीड महिना उलटूनही चौकशी अहवाल न आल्याने दोषींवर कारवाई होणार की नाही, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

तसेच, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हस्तक्षेप करावा आणि दोषी डॉक्टरांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून आणि कुटुंबीयांकडून जोर धरत आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील असा निष्काळजीपणा राज्य सरकारच्या प्रतिमेलाही धक्का देणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. वंशिकेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करून बालिकेला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून आणि नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणात आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि वंशिकेला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here