चामोर्शी (गडचिरोली), दि. १७ एप्रिल २०२६ :
सुरजागड परिसरातून सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीतील निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार चामोर्शीत समोर आला आहे. आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास जुन्या लक्ष्मी गेटजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भरधाव व ओव्हरलोड लोहखनिजाने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली.
ट्रक (क्र. CG 04 PT 1651) ची धडक इतकी भीषण होती की कार (क्र. MH 14 GV 8998) चा उजवा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या कारमध्ये चामोर्शी येथील रुपेश यशवंत लाड (वय ४०) हे त्यांच्या पत्नी श्रुतिका लाड (वय ३५) व दोन लहान मुली – वेदश्री (वय ६) आणि लावण्य (वय १) यांच्यासह उपस्थित होते. अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेनंतर पीडित कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. माजी पंचायत समिती उपसभापती यशवंत लाड, मुरखळा (माल) येथील माजी सरपंच भुदेवी लाड यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या घटनेबाबत चामोर्शीचे पोलीस प्रभारी दीपक डोम यांना विचारणा केली असता त्यांनी या अपघातात कारचालकाची चूक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, कारचालकाने डाव्या बाजूने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ट्रकला धडक दिली.
मात्र, घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पोलिसांच्या या दाव्याला विरोध केला. त्यांच्या मते, लक्ष्मी गेटजवळील रस्त्याच्या कडेला कार उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. या विरोधाभासी माहितीमुळे घटनेबाबत संभ्रम निर्माण झाला असून, कंपनीच्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये पोलीस प्रशासन कंपनीची बाजू घेत आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलीस निरीक्षक दीपक डोम यांनी नागरिकांशी चर्चा करून संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, सुरजागड परिसरातून होणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव ट्रक वाहतुकीमुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चामोर्शी शहरातून जाणाऱ्या अशा जड वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणावे, वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




