Home राजकीय स्वीकृत सदस्य पदाला राष्ट्रवादी अजित पवार गट मुकला की राजकीय कुटनितीमुळे ‘विकले’?...

स्वीकृत सदस्य पदाला राष्ट्रवादी अजित पवार गट मुकला की राजकीय कुटनितीमुळे ‘विकले’? गडचिरोलीच्या राजकारणात खळबळजनक चर्चा…??

0
779

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुकली की जाणीवपूर्वक राजकीय कुटनितीखाली ‘विकली’ गेली? असा खळबळजनक सवाल सध्या गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात जोरात चर्चिला जात आहे. उपाध्यक्ष पदाची निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीनंतर उघड झालेल्या घडामोडींनी महायुतीच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ५ नगरसेवक निवडून आले होते. भाजप सर्वाधिक संख्याबळावर असल्याने दोन स्वीकृत सदस्य भाजपचेच असतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससारख्या महत्त्वाच्या पक्षाला पूर्णपणे विरोधात ठेवणे भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने, निवडणूक निकालानंतर लगेचच आमदार बंटी भांगडिया यांनी “गडचिरोली नगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार” असे जाहीर विधान केले होते.

९ जानेवारी रोजी नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहण समारंभातही आमदार भांगडिया यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येऊन सत्तास्थापना करतील, अशीच दाट शक्यता राजकीय वर्तुळात मानली जात होती.

मात्र प्रत्यक्षात काल उपाध्यक्ष पद व स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या वेळी जे चित्र समोर आले, त्याने सर्व गणितेच कोलमडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक असतानाही एका अपक्ष नगरसेवकाचा स्पष्ट पाठिंबा या पक्षाला मिळत होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या सहा झाली असती आणि काँग्रेस पक्षाशी बरोबरी झाली असती. अशा स्थितीत नगराध्यक्षांचे मतदान, किंवा दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून तोडगा काढणे अपेक्षित होते.

महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्णपणे पात्र, कायदेशीरदृष्ट्या सर्व कागदपत्रे पूर्ण असलेला स्वीकृत सदस्य पदाचा उमेदवारही तयार होता. मात्र ऐनवेळी झालेल्या घडामोडींमध्ये हा उमेदवार डावलण्यात आला. यामागे कोणती राजकीय कुटनिती कामी आली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गडचिरोलीतील राजकीय वर्तुळात अशी खमंग चर्चा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी काँग्रेसशी असलेल्या ‘अघोषित मैत्री’साठी स्वीकृत सदस्य पद जाणीवपूर्वक काँग्रेसच्या वाट्याला जाऊ दिले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्याच पक्षाच्या हिताला तिलांजली दिल्याचा आरोप आता दबक्या आवाजात होत आहे.

इतकेच नव्हे, तर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना, “आपल्या पक्षाचा उमेदवार १०० टक्के तयार असतानाही त्याला डावलणे ही आपल्या पक्षाशीच गद्दारी आहे,” अशी खंत व्यक्त केली आहे.

या सर्व घडामोडींमुळे “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वीकृत सदस्य पदाला मुकला की राजकीय सौदेबाजीमुळे विकला गेला?” हा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. महायुतीची सत्ता बसणार असल्याची दिलेली आश्वासने हवेतच विरत चालल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपकडून आमदार बंटी भांगडिया यांची महायुतीबाबत भूमिका स्पष्ट असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र सत्ता स्थापनेबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया न आल्याने भाजप–राष्ट्रवादी समन्वयावरच संशय बळावत आहे. परिणामी गडचिरोली नगरपालिकेच्या राजकारणात वचनभंग, अविश्वास आणि राजकीय कुटनितीचे विदारक चित्र आता उघडपणे समोर आले आहे.

गडचिरोलीच्या नगरराजकारणात सुरू असलेली ही नाट्यमय खेळी पुढे कोणता नवा वळण घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here