गडचिरोली | प्रतिनिधी :
गडचिरोली शहरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत उपविभागीय पोलिस अधिकारी (IPS) अनिकेत हिरडे यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली शहरातून मोठ्या प्रमाणावर लोहखनिज वाहतूक होत असून, अवजड ट्रकांची अनियंत्रित आणि बेफिकीर हालचाल ही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. विशेषतः शाळकरी मुले, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना या परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठ परिसरात दिवसभर ट्रकांची वर्दळ सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. यामुळे आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका यांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याची बाब निवेदनातून अधोरेखित करण्यात आली.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
शहरात येणाऱ्या अवजड, विशेषतः लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी निश्चित वेळेचे बंधन घालण्यात यावे
रात्रीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराबाहेरील रिंग रोड तातडीने उभारण्यात यावा
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “लोहखनिज ट्रकांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ही परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.”
या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजीत कोवासे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नगरसेवक श्रीकांत देशमुख यांच्यासह हेमंत मोहितकर, मोहन वरगंटिवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनावर दबाव आणत तातडीने ठोस आणि प्रभावी निर्णय घेण्याची मागणी केली.
दरम्यान, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, लोहखनिज वाहतुकीमुळे वाढलेले अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा मुद्दा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला असून, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




