Home विशेष निष्काळजी वाहनचालकांमुळे गडचिरोलीतील वाहतूक व्यवस्था कोलमडली अपघातांची मालिका, परिवहन विभागाच्या दुर्लक्षावर...

निष्काळजी वाहनचालकांमुळे गडचिरोलीतील वाहतूक व्यवस्था कोलमडली अपघातांची मालिका, परिवहन विभागाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

0
500

 

गडचिरोली :

निष्काळजी, बेदरकार वाहनचालकांमुळे गडचिरोली शहरातील वाहतूक विभागाची डोकेदुखी प्रचंड वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे स्थानिक नगरपालिका, राज्य महामार्ग विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांकडून पार्किंग झोन, सर्व्हिस रोड, नाली-गल्ल्यांची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे शहरात वाहतुकीचा गोंधळ वाढत आहे. त्यातच दुचाकी, चारचाकी तसेच जड मालवाहू वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी अपघात घडत असून, या अपघातांचा फटका निष्पाप नागरिकांना बसत आहे.

शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक सिग्नल वारंवार बंद पडत असल्याने तसेच अद्याप ऑनलाइन चलन कॅमेरे बसविण्यात न आल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. अशा वाहनांचा पाठलाग करताना समोरील वाहनचालक आणखी कोणाला धडक देऊन मोठा अपघात घडवेल, ही भीती कायम असते.

तीन आसनी दुचाकी, हेल्मेटविना वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे अशा नियमभंगाच्या घटना सातत्याने घडत असतानाही कारवाई करताना वाहतूक पोलिसांवर राजकीय दबाव व मोठ्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे मर्यादा येत असल्याची चर्चा आहे. परिणामी, अनेक वेळा धोकादायक वाहनचालकांकडे दुर्लक्ष करावे लागत असल्याचा आरोप होत आहे.

गडचिरोली शहर व शहरालगतच्या १० ते १५ किलोमीटर परिसरात वारंवार लहान-मोठे अपघात होत असून, त्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. असे असतानाही राज्य महामार्ग पोलीस, आरटीओ परिवहन विभाग व महामार्ग बांधकाम विभागाकडून वाहतुकीसाठी आवश्यक तांत्रिक यंत्रणा, सूचना फलक, वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड किंवा आधुनिक साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याने बेदरकार वाहनचालकांना पळ काढणे सोपे जात आहे.

याशिवाय शहरातून रेती, गिट्टी व मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर वाहनांच्या मागील डॉल्यांची उंची बेकायदेशीरपणे वाढवून मोठ्या प्रमाणात खनिज तस्करी होत असल्याचा आरोप आहे. या वाहनांतून रस्त्यावर रेती व गिट्टी सांडत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. परिवहन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असतानाही आरटीओ विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पालकत्व असलेल्या जिल्ह्यातच नागरिकांचे जीव धोक्यात जात असतील, तर आपली कैफियत मांडायची तरी कुणापुढे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक जिल्हा प्रशासन, आरटीओ, राज्य महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभाग कुठे तरी गेंड्याची कातडी पांघरून बसले आहेत का, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, गडचिरोली नगरपालिकेने तातडीने ठराव घेऊन शहरातील वाहतुकीसाठी तांत्रिक पद्धतीने बंदोबस्त, सीसीटीव्ही, ऑनलाइन चलन प्रणाली, स्पष्ट सूचना फलक आणि वेग मर्यादा दर्शविणारी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, तसेच जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here