१०८ पुरवठादार कंपनीला कारणे दाखवा नोटीस, तरीही ‘हितसंबंधांमुळे’ कंत्राट कायम असल्याचा गंभीर आरोप…
गडचिरोली :
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तातडीच्या उपचारासाठी नागपूर येथे रेफर करावयाच्या रुग्णांना तासन्तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत असून, या विलंबामुळे अनेक रुग्णांच्या प्रकृतीत अधिक गुंतागुंत निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या जीवाचा वाली कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर बाबींबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, १०८ क्रमांकावर चालणाऱ्या रुग्णवाहिका पुरविणाऱ्या कंपनीकडून वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे, सेवा विस्कळीत राहणे, अपुऱ्या वाहनांमुळे आपत्कालीन रेफर रखडणे अशा तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असे त्यांनी सांगितले.
तसेच १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पुरविणाऱ्या कंपनीला रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मात्र १०२ रुग्णवाहिका प्रामुख्याने गर्भवती महिला, प्रसूत माता व नवजात बालकांसाठी राखीव असल्याने, गंभीर व अपघाती रुग्णांच्या आपत्कालीन रेफरची संपूर्ण जबाबदारी १०८ सेवांवरच अवलंबून आहे. दुर्दैवाने, याच १०८ सेवेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा कोलमडल्याचे वास्तव समोर येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गंभीर आरोप केले आहे की “१०८ रुग्णवाहिका पुरविणाऱ्या कंपनीचे मोठ्या नेत्यांशी थेट हितसंबंध आहेत. त्यामुळे अपुऱ्या सेवा, वारंवार तक्रारी, निष्काळजीपणा असूनही त्याच कंपनीला पुन्हा-पुन्हा कंत्राट दिले जात आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असून, प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या सगळ्या प्रकारात आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा ठळकपणे दिसून येत असताना, जिल्हाधिकारी नेमके काय लक्ष देत आहेत? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी केवळ मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यांपुरतेच सक्रिय असल्याचे दिखाऊ चित्र रंगवत आहेत काय? गंभीर व जीवनमरणाच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी प्रशासन केवळ औपचारिकतेत अडकले आहे का, अशी तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील मुख्य सरकारी रुग्णालयातच जर रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसतील, तर दुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांची अवस्था काय असेल, हा प्रश्न अधिक भयावह आहे.
तातडीने १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, अपयशी ठरत असलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, पर्यायी व्यवस्था उभी करणे आणि रुग्णसेवा सुरळीत करणे ही आता केवळ मागणी नसून काळाची गरज बनली आहे. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी ही थेट प्रशासनावरच राहील, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.




