वडधा (गडचिरोली) :
आरमोरी तालुक्यातील देलोडा बु. येथील आशिष भास्कर मशाखेत्री या तरुणाचा दि. ६ एप्रिल रोजी एसआरपीएफ भरती प्रक्रियेदरम्यान देसाईगंज (वडसा)–विसोरा मार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मशाखेत्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशिष हा कुटुंबातील एकुलता एक कमावता सदस्य होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंब आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडून पडले असून त्यांच्या पुढील उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती असलेल्या या कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी मदतीची नितांत गरज होती.
ही बाब लक्षात घेऊन शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांनी पुढाकार घेत मशाखेत्री कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यांच्या वतीने कवडुजी चापले आणि पुंजीराम मेश्राम यांच्या हस्ते कुटुंबाला मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी वामन राऊत, देवराव सडमाके, भास्कर मशाखेत्री, देविदास ब्राह्मणवाडे, लालाजी हुलके, रामदास भेंडारे, प्रमोद लाडे आणि किशोर मशाखेत्री यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या या मदतीमुळे दुःखात सापडलेल्या मशाखेत्री कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, समाजातील गरजूंना आधार देण्याचा सकारात्मक संदेशही यानिमित्ताने दिला गेला आहे.




