गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय पटावर आज मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. भाजपात दोन दशकांहून अधिक काळ विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत राहून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, तसेच 2022 मध्ये जिल्हाध्यक्ष पदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले गेलेले रवींद्र (रवी) ओलालवार यांनी अखेर भाजपाचा झेंडा खाली ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. अहेरीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
भाजपातील वाढत्याअंतर्गत नाराजीचा घेतला परिणाम?
गेल्या काही महिन्यांपासून भाजपात अंतर्गत नाराजी वाढत असल्याची चर्चा अहेरी–सिरोंचा मतदारसंघात जोर पकडली होती. पक्षातील गटबाजी, काही नेत्यांची एकतर्फी निर्णयप्रक्रिया, तसेच वरिष्ठांकडून होणारी दुर्लक्ष भावना – या अनेक गोष्टींमुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे वारंवार समोर येत होते.
राजकीय वर्तुळात तर चर्चा अशी की, अहेरी–सिरोंचा भागात भाजपातील ‘आउटगोइंग’ वाढत असून अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेशासाठी सज्ज आहेत. रवी ओलालवार यांच्या प्रवेशानंतर या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
भाजप चे जिल्हाध्यक्ष पद दुसऱ्या एका ओबीसी समाजातील कार्यकर्त्याकडे दिल्याने ओलालवार यांची नाराजी वाढली. याच घटनेनंतर पक्षातील काही गटांकडून त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना निर्माण झाली. कार्यकर्त्यांच्याही मनात यामुळे असंतोष होता.
रवी ओलालवार यांनी अनेक वर्षे गडचिरोली जिल्हा परिषदेत काम करत जिल्हाभर विविध विकासकामे राबवली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळातील कामे आजही अनेक गावांमध्ये दिसून येतात.
भाजपात ते सलग तीनवेळा जिल्हा महामंत्री होते, तसेच जवळपास दहा–बारा वर्षे अहेरी विधानसभा प्रभारी म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क प्रस्थापित केला. अहेरी तालुक्यातील ग्रामपातळीपर्यंत त्यांनी संघटन उभारणीची भक्कम कामगिरी केली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युती धर्म पाळत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रचारासाठी धडाडीने काम केले होते. बूथनिहाय रणनीती, कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे आणि जनसंपर्क मोहिमा यामुळे त्यांनी भाजपासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांच्या प्रतिमा आणि प्रभावात घट झाल्याची चर्चा होत होती.
राष्ट्रवादीकडे प्रवेश — अहेरीतील समीकरणे बदलणार!
अहेरी–सिरोंचा भागातील त्यांची प्रभावी पकड पाहता, रवी ओलालवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा आगामी निवडणुकांतील मोठा गेमचेंजर ठरू शकतो. आदिवासी समाजातील त्यांची चांगली प्रतिमा, गावोगावी असलेली ओळख आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची क्षमता पाहता, मोठ्या प्रमाणात भाजपातील कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता आता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
प्रवेश सोहळ्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, की अहेरी व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अनुभवी, समर्पित आणि काम करून दाखवणाऱ्या लोकांची गरज आहे. रवी ओलालवार सारखे नेतृत्व आमच्या पक्षासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
पक्षांतराबाबत बोलताना रवी ओलालवार यांनी स्पष्ट केले, की “स्थानिक प्रश्नांना न्याय मिळावा, आदिवासी समाजाचा विकास व्हावा आणि जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळावी — हेच माझे ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत ही ध्येये अधिक प्रभावीपणे साध्य होतील.”
राजकीय वर्तुळात सुरू चर्चा : भाजपासमोर मोठे आव्हान…
गडचिरोली जिल्ह्यातील भाजपासाठी रवी ओलालवार यांचे बाहेर पडणे हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांच्या सोबत मोठे कार्यकर्त्यांचे समूह हलण्याची शक्यता आहे.
अहेरी–सिरोंचा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे तयार होत असून या घडामोडीनंतर भाजपाची स्थिती कमकुवत होऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत.




