आरोग्याची समस्या ऐरणीवर, आरोग्य सेवेबाबत प्रशासन गंभिर नसल्याचा कुणाल पेंदोरकर यांचा आरोप…
गडचिरोली: जिल्हयात आरोग्य सेवा पुरती विस्कळीत झाली असून मलेरिया व इतर आजारांच्या प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियामुळे अनेक रूग्णांचा आपला जीव गमवावा लागला आहे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. दुर्गम भागातील आरोग्य केंद्र समस्यांच्या विळच्यात सापडली असतांना आता जिल्हा मुख्यालयातील जिल्हा शल्यचिकीत्सकांचे कार्यालयचे ‘गटारगंगा’ बनले वास्तव उघडकीस आले आहे. यामुळे आरोग्याची समस्या ऐरणीवर आली असून आरोग्यसेवेप्रती प्रशासन गंभिर नसल्याचा आरोप कॉंग्रेसच्या असंघटीत कामगार कर्मचारी सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे.
कुणाल पेंदोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्हा सामान्य रूग्णालया लगतच जिल्हा शल्यचिकीत्सकांचे कार्यालय आहे. या कार्यालया समोर मेडीकल कॉलेजची इमारत आहे. पावसाचे पाणी कार्यालया समोर साचत असून कार्यालय परिसराला डबक्याचे स्वरूप आल्याचे दिसून येते. कार्यालया समोर पाणीच पाणी साचले असल्याने कर्मचार्यांना साचलेल्या पाण्यातून जावे लागते. कार्यालयाच्या आवारात पाणीच पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन डेंगू, मलेरिया आदी आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दस्तूरखुद जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कार्यालयाची अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्राची काय अवस्था असेल असा सवालही कुणाल पेंदोरकर यांनी उपस्थित केला आहे.
कार्यालय समोरच गटारगंगा वाहत असल्याने केवळ कार्यालयीन कर्मचारीच नव्हे तर कार्यालयात आरोग्य विशयक कामासाठी येणाया नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे जिल्हयात मलेरियाने थैमान घातले आहे. मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये आरोग्य विशयक जनजागृती करण्यात येत आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी झोपतांना मच्छरदानीचा वापर, घराच्या सभोवताल पाणी साचू देउु नये त्यामुळे डासांचा प्रार्दुभाव होतो, असा सल्ला देण्यात येतो. असे असतांना जिल्हा रूग्णालया समोरील जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कार्यालया समोरील आवाराच ‘गटारगंगा’ बनल्याने आरोग्य प्रशासनाचे वाभाडे निघाले असल्याचे आरोपही कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे.