गडचिरोली : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर यांच्या नेतृत्वात आलेल्या मंडळ यात्रेने गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात व शहरातील विविध ठिकाणी केंद्राला भेट देऊन आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या व अन्याय- अत्याचाराचे प्रश्न विचारात घेऊन ते कसे सोडवले जातील यावर चर्चा करण्यात आली होती. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस आपले अभियान राबवणार येत असल्याची माहिती मिळाली, मंडळ यात्रेने या भेटीदरम्यान आदिवासी व बहुजन समाजावर होणारे अन्याय तात्काळ थांबविणे आणि गावागावातील नागरिकांना प्रशासनाने समंजसपणे वागणूक द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर,जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या पत्रकार परिषदेत, ग्रामीण,शहरी व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी व बहुजन समाज बांधवांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा जबरदस्ती होऊ नये, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्याशी सरकार व प्रशासनाने सन्मानाने वागावे, हे स्पष्ट करण्यात आले. राजा राजपुरकर यांनी सरकार चे लक्ष वेधत सांगितले की, “माझ्या आदिवासी व बहुजन समाजाच्या बांधवांना सर्वतोपरी मदत मिळणे हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, प्रशासनाने सुनिश्चित करावे.”
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या योजनेचा कोणताही फायदा स्थानिक नागरिकांना होत नसल्याचे उल्लेख करत, काही ठिकाणी सरकार,प्रशासन कडून गोरगरीब आदिवासी जनतेला वनवासी असा शिक्का मारला जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. या मानसिकतेत बदल होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
या यात्रेत अनेक ठिकाणी शेकडो महिलांनी यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना राखी बांधून आपला पाठिंबा व्यक्त केला होता…
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर,जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सचिव अँड संजय ठाकरे,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले,तालुका अध्यक्ष, गडचिरोली शहर प्रमुख विजय गोरडवार,आदी राष्ट्रवादी नेते उपस्थित होते.
मंडल यात्रेच्या या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी, ओबीसी आणि बहुजन समाजामध्ये आत्मविश्वास वाढीस लागला जाणार असून,येणाऱ्या काळात सर्व निवडणुकांमध्ये आमच्या पक्षा सोबत नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.