सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत अहेरी तालुक्यातील महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवसाचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात विशेषतः महिलांसाठी पुढील उपक्रम राबवण्यात आले:
आभा कार्ड व चिकनसेल ग्रस्त कार्डची नोंदणी व वितरण
गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व (ANC) तपासणी, माता व बाल सुरक्षा कार्ड (MCP) वितरण व मार्गदर्शन
आयुष्मान भारत व वन वंदना योजना अंतर्गत कार्ड नोंदणी…
मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापनावरील मार्गदर्शन…
पोषण व संतुलित आहाराबाबत माहितीचे वितरण…
या उपक्रमांचा उद्देश महिलांना त्यांच्या आरोग्य हक्कांची जाणीव करून देणे, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, तसेच किशोरी व युवतींमध्ये स्वच्छता आणि पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम आणि त्यांच्या आरोग्य पथकाने सक्रिय सहभाग घेतला. महागाव ग्रामपंचायत सरपंच मडावी ताई यांची विशेष उपस्थिती लाभली. लाभार्थ्यांना विविध वैद्यकीय तपासण्या, सल्ला तसेच आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात आली. या यशस्वी उपक्रमात आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे, असे अनेक महिलांनी सांगितले.