जाळायचंच असेल तरआधी स्वतःमधील रावणाला जाळा…

0
199

विजयादशमी विशेष…

 

बहुतांश लोक रावणाला “खलपुरुष ” मानतात. काहींना तो पुजनीय आहे! त्यांचं पवित्र दैवत आहे! पुष्कळ वर्षांपूर्वी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्हि. भी. कोलते यांनी ” महात्मा रावण ” नावाचं पुस्तक लिहलं होतं. कुलगुरू सारखी जबाबदार व्यक्ती उगीच काहीतरी  लिहणार नाही. अभ्यास करूनच त्यांनी आपले विचार मांडले असावेत! माझ्या वाचनात पण ते पुस्तक आलं होतं. मला तरी त्यात गैर असं काहीच आढळलं नाही. रावण विद्वान आणि ज्ञानी होता. अनेक विषयात पारंगत होता. ऋषी कुलात त्याचा जन्म झाला होता. तो निस्सीम शिवभक्त असून अनेक सिद्धी त्याने प्राप्त केल्या होत्या. अनेक विषयाचं त्याला ज्ञान होतं. असा हा ज्ञानीपुरुष सीतेचं अकारण अपहरण करेल हे संभवत नाही. सीता साक्षात जगतजननी लक्ष्मी देवी होती. रावणाला हे ठाऊक नसावं काय? ठाऊक असुनही त्यानं धाडस केलंच असेल तर जगतजननीला उचलून नेणं एवढं सोपं होतं काय याचा सुज्ञ जणांनी अवश्य विचार करावा!

वाल्मिकी रामायण…. तुलसी रामायण… कन्नड तिबेटी… सिंहली आणि अन्य भाषेतील रामायणे डोळ्यांखालून घातली तर कितीतरी विसंगती आढळून येतात. एकवाक्यता दिसत नाही.

रावणाने सीतेला अशोक वाटीकेत ठेवून सर्व सुखसोयी पुरवल्या. मर्यादेचं कुठलंच उल्लंघन केलं नाही. रावण हजारो वर्षे जगला. अपहरण केलं तेव्हा तो नेमका किती वर्षाचा होता याबद्दल मतभिन्नता आहे. साधं शंभर वर्षाचं आयुष्य जगतांना माणसाच्या नाकीनऊ येतं. रावण हजारो वर्षे कसा जगला असावा? कोडंच आहे! कुंभकर्ण सहा सहा महिने झोपत घालवत होता ही गोष्ट मनाला पटत नाही. नक्कीच लिहणाऱ्यांनी काहीतरी बदमाशी केली असावी!

रावण दुष्ट होता की नाही माहीत नाही पण रावणापेक्षा कितीतरी पटीने नीच नि घातक असलेले नराधम या जगात होऊन गेले नि आज सुद्धा अस्तित्वात आहेत. त्यांना कां जाळलं जात नाही हा माझा सवाल आहे! रावणाला केवळ दहा तोंडं होती. यांना तर हजारो लाखो तोंडं आहेत. कधी काय बोलतील सांगता येत नाही.

रावणाला जाळण्याचा नैतिक अधिकार त्यालाच आहे जो पूर्णतः पवित्र आहे! कुठल्याही ऐऱ्यागै ऱ्याने रावणाला उठसुठ जाळावं इतका रावण स्वस्त नाही.

जाळायचं असेल तर स्वतःतील खलपुरुषाला जाळा. भलं होईल तुमचं अन लोकांचं पण!

श्रीनिवास गेडाम

Gadchiroli.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here