आरमोरी | प्रतिनिधी
आरमोरी तालुक्यातील किटाळी गावाजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तुळशीदास रामा सहारे यांचा जागीच मृत्यू, तर वीरेंद्र तुळशीदास सहारे हे गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी चालक दिलीप सोमाजी टेकाम हेही जखमी झाले असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव (ता. आरमोरी) येथील रहिवासी दिलीप सोमाजी टेकाम (वय 48, व्यवसाय मजुरी) हे आपल्या गावातील तुळशीदास रामा सहारे व वीरेंद्र तुळशीदास सहारे यांच्यासह दुचाकी क्रमांक MH-34/P-8785 वरून वाल्याच्या शेंगा घेऊन देऊळगावकडे येत होते.
दरम्यान, किटाळी गावाजवळील बसस्टॉप परिसरात, ट्रक लारी क्रमांक TS-07/UK-3992 चा चालक वाहन अतिवेगात, हयगयीने व निष्काळजीपणे चालवत असताना त्याने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील प्रवासी तुळशीदास सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वीरेंद्र सहारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकी चालक दिलीप टेकाम यांनाही दुखापत झाली आहे.
या प्रकरणी जखमी दुचाकी चालक दिलीप सोमाजी टेकाम यांच्या तोंडी तक्रारीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात अपघात क्रमांक 18/2026 नोंदविण्यात आला आहे.
ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125(A), 125(B), 324(4), 184 तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 (A)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दि. 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.26 वाजता नोंदविण्यात आला असून दाखल अधिकारी सफौ/1828 निलंकट कोकोडे (पोलीस ठाणे आरमोरी) आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख पोरटे करीत आहेत.
सुट्टीच्या वर्दळीच्या दिवशी भरधाव व निष्काळजी वाहनचालकामुळे एकाचा जीव गमवावा लागल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




