Home आरोग्य गडचिरोलीत जार पाण्याच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह; सर्व वॉटर प्लांट तपासणीची मागणी…

गडचिरोलीत जार पाण्याच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह; सर्व वॉटर प्लांट तपासणीची मागणी…

0
17

 

गडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या थंड पाण्याच्या जारच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय गोपाळराव मेश्राम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी अर्ज सादर करून गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व जार पाणी विक्रेते व वॉटर प्लांटची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.

मेश्राम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक, लहान मुले, हॉटेल व्यवसाय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जार पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र अनेक ठिकाणी कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय तसेच आरोग्यविषयक नियमांचे पालन न करता हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक विक्रेते केवळ पाणी थंड करून विक्री करत असून त्या पाण्याची शुद्धता, टीडीएस पातळी, बॅक्टेरिया तसेच रासायनिक घटकांची कोणतीही नियमित तपासणी होत नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण झाला असून सर्व विक्रेत्यांच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

दूषित व निकृष्ट दर्जाच्या पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया यांसारख्या जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा प्रश्न केवळ एखाद्या एका प्लांटपुरता मर्यादित नसून संपूर्ण शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याचे मेश्राम यांनी म्हटले आहे.

यासोबतच निकृष्ट दर्जाचे पाणी विक्री करणाऱ्या सर्व वॉटर प्लांट व जार पाणी विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा प्लांटना तात्काळ बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सदर अर्ज अन्न व औषध प्रशासन कार्यालय गडचिरोली येथे सादर करण्यात आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली तसेच नगर परिषद गडचिरोली यांनाही माहिती व पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here