Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत खळबळ! महाराष्ट्र बँकेच्या शाखेत २१०० रुपयांच्या नकली नोटांचा भरणा; पश्चिम महाराष्ट्र...

गडचिरोलीत खळबळ! महाराष्ट्र बँकेच्या शाखेत २१०० रुपयांच्या नकली नोटांचा भरणा; पश्चिम महाराष्ट्र कनेक्शनमुळे तपासाला वेग…

0
228

 

गडचिरोली : शहरातील कारगिल चौक परिसरातील Bank of Maharashtra च्या शाखेत नकली नोटांचा भरणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. गडचिरोली शहरात प्रथमच बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनद्वारे नकली नोटा जमा करण्यात आल्याची घटना समोर आल्याने बँकिंग सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथील एका खातेदाराच्या खात्यात गडचिरोली शाखेतून २१०० रुपयांचा भरणा करण्यात आला होता. मात्र, पुढील तपासणीदरम्यान जमा करण्यात आलेल्या नोटा नकली असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे बँक प्रशासनासह ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा भरणा एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करण्यात आला. पहिल्या वेळी १०० रुपयांच्या १२ नोटा, दुसऱ्या वेळी १०० रुपयांच्या ५ नोटा आणि तिसऱ्या वेळी १०० रुपयांच्या ४ नोटा अशा प्रकारे एकूण २१०० रुपयांची रक्कम मशीनमध्ये जमा करण्यात आली. विशेष म्हणजे बँकेच्या मशीनने या नोटा स्वीकारल्याने संबंधित कॅश डिपॉझिट मशीनच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षा यंत्रणेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“मशीनमध्ये नकली नोटा ओळखण्याची अत्याधुनिक यंत्रणा नव्हती का?”, “जर होती तर नकली नोटा स्वीकारल्या कशा गेल्या?”, “बँकेकडून मशीनची नियमित तपासणी केली जाते का?” असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

गडचिरोली शहरात अनेक राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत असून विविध बँकांच्या समन्वयासाठी लीड बँक कार्यालयही शहरात आहे. अशा परिस्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागातील शाखेत नकली नोटांचा भरणा होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेनंतर अनेक खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “आपल्या खात्यात अशाच प्रकारे काही गैरव्यवहार होणार नाही ना?” अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शाखा व्यवस्थापकांनी Gadchiroli Police येथे अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नकली नोट प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज, मशीन व्यवहारांची माहिती आणि संबंधित खात्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथील खात्यात गडचिरोलीतून नकली नोटांचा भरणा झाल्याने आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्र ते गडचिरोलीपर्यंत नकली नोटांचे जाळे सक्रिय आहे का? अशा टोळ्यांचा जिल्ह्यात वावर आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे शहरातील बँकिंग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचतात का आणि बँक प्रशासन सुरक्षा व्यवस्थेत कोणते बदल करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here