Home आरोग्य ऑनलाईन फार्मसीविरोधात 20 मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; प्रशासन सतर्क, रुग्णांसाठी विशेष...

ऑनलाईन फार्मसीविरोधात 20 मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; प्रशासन सतर्क, रुग्णांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू…

0
66

 

औषध विक्रेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची तयारी; आपत्कालीन सेवांसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर…

 

गडचिरोली, दि. 18 : All India Organisation of Chemists and Druggists या संघटनेच्या आवाहनानुसार बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय बंद आंदोलन पुकारले आहे. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात हे आंदोलन करण्यात येत असून, यामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील विविध औषध विक्रेते, मेडिकल दुकानदार आणि घाऊक व्यापाऱ्यांशी संपर्क साधून बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंदच्या दिवशी काही मेडिकल दुकाने सुरू राहतील, यासाठी संबंधित संघटनांशी समन्वय साधण्यात आला असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाचे हेल्पलाईन नंबर उपलब्ध…

रुग्णांना अत्यावश्यक औषधांची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. औषध निरीक्षक श्रीमती नालंदा उरकुडे (मो. 9096414104) तसेच सहायक आयुक्त (औषधे) नीरज लोहकरे (मो. 7276544972) यांच्याशी नागरिक थेट संपर्क साधू शकणार आहेत.

तालुकानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :

सिरोंचा – 9421729671

भामरागड – 9404438383

एटापल्ली – 9421856516

आलापल्ली – 9421729384

अहेरी – 9767820220

मुलचेरा – 9421854819

आष्टी – 9422151299

चामोर्शी – 9588678242

गडचिरोली – 9421735620 / 9423422130

आरमोरी – 9403820216 / 9420973680

वडसा – 9422150640 / 8999362844

कुरखेडा – 9404831332

कोर्ची – 9422154766 / 7757005944

धानोरा – 7588772743

ऑनलाईन औषध विक्रीमुळे नकली औषधांचा धोका वाढल्याचा आरोप…

दरम्यान, आज District Chemist and Druggist Association Gadchiroli तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन फार्मसीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव प्रकाश दत्ता, देवेंद्र सोमनकर तसेच महिला प्रतिनिधी गायत्री सोमनकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कोरोना काळात मोठ्या ऑनलाईन कंपन्यांनी प्रचंड डिस्काउंटचे आमिष दाखवून लोकांना ऑनलाईन औषध खरेदीकडे वळवले.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी ग्राहकांना मागवलेल्या औषधांऐवजी वेगळ्याच प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये नकली औषधेही वितरित झाल्याच्या तक्रारी विविध जिल्ह्यांत करण्यात आल्या होत्या. या संदर्भात काही मेडिकल संघटनांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर तपासणीदरम्यान संबंधित ऑनलाईन कंपन्यांचे स्पष्ट ठिकाण आणि जबाबदार व्यवस्था शोधण्यात अडचणी आल्याचा दावा संघटनेने केला.

“प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध पुरवठा धोकादायक”

पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, ऑनलाईन माध्यमातून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अनेक प्रकारची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे युवकांकडून नशेसाठी औषधांचा गैरवापर वाढण्याची शक्यता आहे. तसेच गर्भपातासंबंधी औषधेही ऑनलाईन सहज मिळत असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक मेडिकल दुकानदारांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर कठोर नियम लागू असताना, ऑनलाईन कंपन्यांकडून अशा नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही संघटनेने केला. चुकीची औषधे किंवा नकली औषधांचा पुरवठा झाल्यास रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

“लहान मेडिकल दुकानदारांना संपवण्याचा प्रयत्न”

मोठ्या ऑनलाईन कंपन्या कमी दर आणि आकर्षक सवलती देऊन ग्रामीण व लहान मेडिकल दुकानदारांचा व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संघटनेने केला. सरकारने तात्काळ ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मेडिकल दुकानदार संघटनेने दिला.

तथापि, बंददरम्यान आपत्कालीन परिस्थितीत काही मेडिकल दुकाने सुरू राहतील, तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासन आणि मेडिकल संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here