गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकच्या अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून, ही बाब आता गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. ओव्हरलोड वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि बेदरकार वाहनचालना यामुळे अनेक वेळा निष्पाप नागरिक या ट्रकखाली चिरडले गेले आहेत. मात्र, या घटनांनंतरही संबंधित वाहतूक यंत्रणा व जिल्हा प्रशासनाकडून ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील लोहखनिज वाहतूक करणारी ही वाहने अक्षरशः सुसाट वेगाने धावत असून, दुचाकी व चारचाकी वाहनांप्रमाणे धोकादायक ओव्हरटेक करताना दिसून येतात. विशेषतः गडचिरोली–आष्टी–आलापल्ली या मार्गांवर या ट्रकची दहशत वाढली असून, सर्वसामान्य वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
किरकोळ वाहनांवर कारवाई, मात्र अवजड ट्रक मोकाट…
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकी व चारचाकी वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणारी यंत्रणा, मात्र हेच नियम लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड ट्रकवर लागू करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वेगमर्यादा, क्षमतेपेक्षा जादा वजन, बेकायदेशीर वाहतूक यांसारख्या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
अपघातानंतर कारवाई ऐवजी ‘प्रकरण मिटवण्याची’ घाई…
या ट्रकच्या अपघातानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी, परिस्थिती कशी निवळेल व प्रकरण कसे दाबले जाईल, यासाठीच संपूर्ण यंत्रणा सक्रिय होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ट्रकचालकांमध्ये ‘काहीही झाले तरी आपले कोणी वाकडे करू शकत नाही,’ असा गैरसमज आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
चामोर्शी मार्गावर मोठा अपघात टळला…

आज गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कॉर्पिओ वाहन व एसटी बसला धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र, या घटनेने पुन्हा एकदा या ट्रकच्या बेदरकार वेगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नागरिकांच्या जीवाला धोका; जीवन झाले स्वस्त…कठोर कारवाईची मागणी…
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या वेगावर व ओव्हरलोड वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण न आणल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांकडून अवजड वाहनांवर कठोर तपासणी, वजनमापन केंद्रांची सक्ती, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
प्रशासन आणि वाहतूक यंत्रणा नेमकी कधी जागी होणार, असा सवाल आता संपूर्ण जिल्हा विचारत आहे.




