Home विशेष तीन हजारांहून अधिक ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; “जबरदस्तीने जमीन घेतली तर...

तीन हजारांहून अधिक ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; “जबरदस्तीने जमीन घेतली तर ४ जूनला जिल्हाधिकारी कार्यालय ताब्यात घेण्याची चेतावणी…”

0
198

गडचिरोलीत विमानतळ भू-अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा जनसागर उसळला…

जनगणना बहिष्कार, पोलिसांवर गंभीर आरोप आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप…

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहण प्रक्रियेविरोधात आता ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकदिवसीय ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि राज्य सरकारला थेट इशारा दिला. हिरापूर, राखी, गुरुवडा, शिरपूरचकसह अनेक गावांतील जवळपास तीन हजारांहून अधिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

“आमच्या जमिनीवर जबरदस्तीने अधिग्रहण लादण्याचा प्रयत्न केल्यास येत्या ४ जून रोजी हजारो ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मोठे आंदोलन उभारतील,” अशी आक्रमक चेतावणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.

गेल्या महिनाभरापासून प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात विमानतळासाठी सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रस्तावित विमानतळासाठी त्यांच्या सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असून, ही जमीनच त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा एकमेव आधार आहे. त्यामुळे गावागावांत संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

आंदोलनादरम्यान अनेक वक्त्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले. मागील आठवड्यात हिरापूर गावात पोलिसांच्या फौजफाट्यासह सुरू असलेल्या सर्वेक्षणावेळी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासूनही रोखल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गावकऱ्यांनी आणलेले पाण्याचे कॅन पोलिसांनी अडविल्याचे काही वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या आरोपानंतर विशेषतः महिला ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळलेला दिसून आला. आंदोलनस्थळी महिलांनी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, या आंदोलनाचा परिणाम आता जनगणना प्रक्रियेवरही दिसून येत आहे. हिरापूरसह काही गावांमध्ये जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी परत पाठविल्याची माहिती समोर आली आहे. “जेव्हा सरकार आमचे गावच संपविण्याच्या तयारीत आहे, तेव्हा जनगणना कशासाठी?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांनी गावागावांत बैठका घेऊन जनगणना प्रक्रियेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आजच्या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील, याची प्रशासनालाही कल्पना नसल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती. प्रशासन आणि पोलीस विभागाला मर्यादित संख्येत नागरिक येतील, अशी अपेक्षा होती. मात्र हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला आणि युवक आंदोलनासाठी दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) तथा आयपीएस अधिकारी अनिकेत हिरडे हे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भाषणांचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेऱ्यांनी सज्ज विशेष वाहनही पोलीस विभागाने आंदोलनस्थळी उभे केले होते.

आंदोलनकर्त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की, “जिल्ह्यात उपलब्ध असलेली सरकारी वनजमीन प्रकल्पासाठी का वापरली जात नाही? शेतकऱ्यांची सुपीक जमीनच उद्योगपतींसाठी का बळकावली जात आहे?” ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत ते आपली जमीन देणार नाहीत आणि जबरदस्तीने अधिग्रहणाचा प्रयत्न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

आजचे आंदोलन हे गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी असंतोषाचे मोठे प्रतीक मानले जात आहे. एका बाजूला प्रशासन विमानतळ प्रकल्प पुढे नेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे शेतकरी आणि ग्रामस्थ “जमीन वाचवा”च्या घोषणेसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रशासन आणि ग्रामस्थांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here