Home ब्रेकिंग न्यूज विमानतळ भू-अधिग्रहणाचा वाद चिघळला; आता जनगणनेलाही ग्रामस्थांचा ठाम विरोध…

विमानतळ भू-अधिग्रहणाचा वाद चिघळला; आता जनगणनेलाही ग्रामस्थांचा ठाम विरोध…

0
79

 

हिरापूर, राखी, गुरुवडा आणि शिरपूरचक गावांमध्ये प्रशासनाविरोधात संताप; “जमीन वाचवा” आंदोलन अधिक तीव्र…

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहण प्रक्रियेवरून निर्माण झालेला संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून हिरापूर, राखी, गुरुवडा आणि शिरपूरचक या गावांमध्ये प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर परिसरात आधीच संतप्त वातावरण निर्माण झालेले असताना आता ग्रामस्थांनी थेट जनगणना प्रक्रियेलाच विरोध दर्शविल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या वतीने जनगणनेचे काम करण्यासाठी गावांमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवत परत पाठविले. त्यामुळे या चारही गावांमध्ये जनगणनेचे काम पूर्ण होणार कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी गावागावांत बैठका घेऊन सामूहिक भूमिका जाहीर केली असून, “जमिनीच्या जबरदस्तीच्या अधिग्रहणामुळे आमच्या आयुष्यावर आणि भवितव्यावर संकट आले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबाची कोणतीही वैयक्तिक माहिती प्रशासनाला देणार नाही,” असा ठराव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या परिसरातील बहुतांश नागरिकांचे मुख्य उपजीविकेचे साधन शेती असून, प्रस्तावित विमानतळासाठी सुपीक जमीन संपादित केली जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आमच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या शेतीवर सरकार डोळा ठेवत आहे. जमीन गेली तर आमचे अस्तित्वच संपेल,” अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाल्याने गावकऱ्यांच्या मनात प्रशासनाविषयी अविश्वास आणि संताप अधिक वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जनगणना प्रक्रियेलाच विरोध होत असल्याने प्रशासनाचीही मोठी गोची झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण जनगणना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. अशा परिस्थितीत संबंधित गावांमध्ये जनगणनेचे काम रखडल्यास प्रशासनासमोर तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती हाताळण्यासाठी तहसीलदारांसह काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संबंधित गावांना भेट देणार असून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “जनगणना ही नागरिकांच्या हितासाठी आणि विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया आहे,” असे सांगून प्रशासन ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, दुसरीकडे ग्रामस्थांनीही आपली भूमिका अधिक कठोर केली असून, “जमिनीच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा दिला आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्प, भूमी अधिग्रहण आणि आता जनगणना या मुद्द्यांवरून ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष हिरापूर, राखी, गुरुवडा आणि शिरपूरचक या गावांकडे लागले असून, पुढील काही दिवसांत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here