Home राजकीय गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : “पक्ष निकष बाजूला.. मन...

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : “पक्ष निकष बाजूला.. मन मर्जीतल्या व्यक्तीला तिकीट; मग उच्चशिक्षित समाजसेवकांना स्थान का नाही?”

0
618

 

गडचिरोली :

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक पातळीवर अशी चर्चा जोमात आहे की काही पक्षांनी पक्षाचे निकष, नैतिक मूल्ये आणि गुणवत्ता या तिन्ही गोष्टींना दुय्यम ठरवून, फक्त “आपल्या हाताखाली राहू शकणाऱ्या” सांगितलेले ऐकू शकणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, एक प्रश्न मोठ्याने विचारला जात आहे — “जेव्हा समाजाचा आणि शहराचा विकास करायचा आहे, तेव्हा गुणवत्ताधारक आणि उच्चशिक्षित उमेदवारांना बाजूला ठेवून फक्त ‘सही करणारे’ पुढे आणायचे का?”

 

शहरातील सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक वर्गातून असे मत येत आहे की, पक्षांनी “आपल्या नियंत्रणात राहणारे उमेदवार” निवडून आणण्याची प्रवृत्ती अंगीकारली आहे.

पक्षाचे मूळ निकष – कौशल्य, शैक्षणिक पात्रता, जनसंपर्क, आणि विकासदृष्टी – यांचा विचारच होत नाही. परिणामी, समाजहिताच्या दृष्टीने काम करू शकणारे उच्चशिक्षित उमेदवार वंचित राहतात.

 

एका नागरिकाने स्पष्ट भाषेत सांगितले, की “ज्याच्याकडे समाज बदलण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे राजकारणात जागा नाही आणि ज्याला काहीच समजत नाही, तो ‘हो’ म्हणतो म्हणून तिकीट मिळतं — हा विरोधाभास नाही का?”

 

 

गडचिरोली शहरात आज ‘बापू, इथे सही कर’ ही संस्कृती परत डोकं वर काढताना दिसते आहे.

जिथे योग्य आणि सुशिक्षित उमेदवारांना दूर ठेवून, केवळ ‘होकार’ देणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातंय.परंतु, शहरातील नागरिक आता अधिक जागरूक झाले असून ते म्हणतात —

 

 “आम्हाला फक्त पक्षनिष्ठ नाही, तर विचारनिष्ठ आणि विकासाभिमुख उमेदवार हवेत.”

 

 

विकासासाठी सुशिक्षितांची गरज…

आजच्या काळात शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर निर्णयक्षम, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले लोक नेतृत्वात आले पाहिजेत.

इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते — हेच समाजाला दिशा देऊ शकतात, अशी स्पष्ट भावना नागरिकांमधून उमटत आहे.

 

मात्र काही पक्ष फक्त आपल्या नियंत्रणात राहणारे उमेदवार उभे करत असतील, तर हे केवळ पक्षासाठीच नव्हे तर शहराच्या प्रगतीसाठीही घातक ठरेल, अशी चर्चा सुरू आहे.

 

गडचिरोलीतील मतदार आता बदलाची हाक देत आहेत.

ते म्हणतात —

 

 “आम्हाला सही करणारे नाही, विचार करणारे उमेदवार हवेत.

शहराचा विकास हवा, तर शिक्षित नेते हवेत.”

 

आगामी निवडणुकीत जनता या प्रश्नाचं उत्तर मतपेटीतून देईल का, हे पाहणे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here