गडचिरोली : देशभरात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या औषध विक्रीच्या विरोधात बुधवारी, 20 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया केमिस्ट बंदला गडचिरोली जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील मेडिकल व्यावसायिकांनी एकदिवसीय बंद यशस्वी करत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
गडचिरोली शहरात केमिस्ट भवन येथून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून इंदिरा गांधी चौकात पोहोचला. तेथे मेडिकल व्यावसायिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत ऑनलाइन औषध विक्री धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात गडचिरोली तालुक्यातील सुमारे 75 मेडिकल दुकानदार सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही मेडिकल दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
मेडिकल व्यावसायिकांनी यावेळी ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ऑनलाइन माध्यमातून मागविलेल्या औषधांमध्ये अनेकदा डॉक्टरांनी सुचविलेल्या औषधांऐवजी वेगळ्या घटकांची औषधे मिळत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नकली औषधे, मुदतबाह्य औषधे तसेच प्रतिबंधित औषधे सुद्धा ऑनलाइन सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, औषध हा अत्यंत संवेदनशील विषय असून डॉक्टरांचा सल्ला आणि अधिकृत मेडिकल दुकानदारांच्या देखरेखीशिवाय औषधांचा वापर धोकादायक ठरू शकतो. ऑनलाइन विक्रीमुळे अनेक रुग्ण चुकीची औषधे घेत असल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मेडिकल दुकानदारांनी मोठ्या कंपन्यांवरही टीका केली. मोठ्या व्यावसायिक कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किरकोळ मेडिकल दुकानदारांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे छोट्या मेडिकल व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट निर्माण झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
ऑल इंडिया केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाभरातील मेडिकल व्यावसायिकांनी एकजूट दाखवत आंदोलन यशस्वी केले असून सरकारने तातडीने ऑनलाइन औषध विक्रीबाबत कठोर धोरण जाहीर करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.




