सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वितरण; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्रथम प्राधान्य…
गडचिरोली, दि. १३ : देशात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य युद्धजन्य परिस्थिती तसेच आपत्कालीन संकटांचा विचार करून राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल ४८ हजार लिटर अतिरिक्त केरोसीन मंजूर केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना स्वयंप्रकाश आणि दिवाबत्तीसाठी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (PDS) हे केरोसीन सात तालुक्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने विशेष परिस्थिती लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिरिक्त केरोसीन नियतन मंजूर केले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता, दुर्गम भागातील अडचणी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना प्रकाशासाठी पर्यायी साधन उपलब्ध राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय वाटपानुसार गडचिरोली तालुक्यासाठी सर्वाधिक १२ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. तर चामोर्शी, धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या प्रत्येक तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाने संबंधित वितरण यंत्रणांना नियोजनबद्ध पद्धतीने साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार अंत्योदय अन्न योजना (AAY) तसेच प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरणात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय, ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी उपलब्ध नाही अशा कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार केरोसीन देण्यात येणार आहे. मागणी आणि उपलब्धता लक्षात घेऊन इतर शिधापत्रिकाधारकांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वयंप्रकाश आणि दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेले केरोसीन जवळच्या अधिकृत केरोसीन विक्रेत्याकडून प्राप्त करून घ्यावे आणि शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात आजही अनेक कुटुंबे प्रकाशासाठी केरोसीनवर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाचा हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक जीवनावश्यक सुविधा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपाय मानला जात आहे.




