गडचिरोली : गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, क्यूआरटी, पोलीस मदत केंद्र आणि विशेष शाखांमध्ये कार्यरत असलेल्या १० पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वाहतूक शाखा गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश एम. रमेश भापोसे यांनी १६ मे २०२६ रोजी जारी केले.
जारी आदेशानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कौटुंबिक, वैद्यकीय, जनहित तसेच प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (१)(ई) तसेच सन २०१४ व २०१५ मधील महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विविध शाखांमधून थेट वाहतूक शाखेत बदली…
या आदेशानुसार उपपोस्टे देचलीपेठा, पोस्टे सिरोचा, पोस्टे गडचिरोली, पोलीस मुख्यालय, सुरजागड पोलीस मदत केंद्र, ग्यारापट्टी पोलीस स्टेशन, क्यूआरटी भामरागड आणि आरसीबी अहेरी येथील कर्मचाऱ्यांना थेट वाहतूक शाखा गडचिरोली येथे नियुक्त करण्यात आले आहे.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संतोष काशिनाथ धोटे, संजय शंकर चक्कावार, छाया गंगाधर ठाकरे, उमेश शंकर पिठाले, अरुण विनायक बरकनदाज, अरविंद मनोहर खोब्रागडे, राकेश माईली नागुला, कृष्णा पदमाकर पिपरे, गणेश गुरुदेव गुरनुले आणि प्रशांत वासुदेव सोरते यांचा समावेश आहे.
तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश…
पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने कार्यमुक्त करून वाहतूक शाखा गडचिरोली येथे रवाना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी नवीन नियुक्तीस्थळी हजर झाल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
वाहतूक शाखा गडचिरोलीच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही संबंधित कर्मचारी आमद झाल्यानंतर त्याची माहिती कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली…
एकाच आदेशात विविध संवेदनशील व नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत असलेल्या १० कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली झाल्याने पोलीस विभागात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना एकाच शाखेत नियुक्ती देण्यात आल्याने या निर्णयाकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदेशात या बदल्या केवळ कौटुंबिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




