Home आरोग्य विषप्राशन केल्यामुळे २३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…आरोग्य विभागाची कोणतीही निष्काळजी नाही…जिल्हा आरोग्य...

विषप्राशन केल्यामुळे २३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…आरोग्य विभागाची कोणतीही निष्काळजी नाही…जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती.

0
12

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातील कांदोळी (प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी अंतर्गत) येथे विषप्राशन केल्यामुळे २३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाने वस्तुस्थितीदर्शक प्राथमिक खुलासा करत, उपलब्ध यंत्रणेद्वारे तत्काळ उपचार व पुढील संदर्भ प्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी संबंधित महिलेने ऑर्गॅनोफॉस्फरस (OP) प्रकारचे विषप्राशन केले. घटनेनंतर नातेवाईकांनी स्थानिक उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधला नाही. त्यांनी स्वतःच दुचाकीवरून रुग्णाला बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. सकाळी सुमारे १०.५० वाजता रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, बुर्गी येथे दाखल झाल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला शासकीय रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे पाठविण्यात आले. त्या वेळी नियमित रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने पर्यायी व्यवस्था करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विषबाधेची तीव्रता वाढल्यामुळे काही वेळातच संबंधित महिलेचा मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकरणात आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध संसाधनांच्या आधारे तात्काळ प्रतिसाद देण्यात आला असून रुग्णाला वेळेत प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. प्रारंभीचा विलंब हा नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क न साधता स्वतः रुग्ण नेल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर पुढील संपूर्ण प्रक्रिया शासकीय यंत्रणेद्वारेच पार पाडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा परिषद गडचिरोली) यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून उपचारात होणारा विलंब टाळता येईल आणि जीव वाचवता येईल. या घटनेमुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवांबाबत जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here