Home आरोग्य ‘आपत्कालीन वार्ड’ की ‘गॅस चेंबर’? जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप…

‘आपत्कालीन वार्ड’ की ‘गॅस चेंबर’? जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप…

0
59

 

गडचिरोली : मुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर अव्यवस्था आणि निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या आपत्कालीन वार्डातील सर्व एसी बंद असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टरांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी “रुग्णालय प्रशासन जिवंत आहे की जिल्हा रुग्णालयाला गॅस चेंबर बनवून रुग्णांना मरण्यासाठी सोडले आहे?” असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास राज बन्सोड हे काही रुग्णांची विचारपूस करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वार्डात गेले होते. त्यावेळी त्यांनी पाहिले की वार्डातील सहाच्या सहाही वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत आहेत. प्रचंड उकाडा आणि घुसमट निर्माण झाल्याने रुग्ण अक्षरशः हैराण झाले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनाही काही मिनिटांपेक्षा अधिक वेळ वार्डात थांबणे कठीण होत होते. परिस्थिती इतकी गंभीर होती की राऊंडवर येणाऱ्या डॉक्टरांनाही त्या ठिकाणी अधिक वेळ थांबणे अवघड जात असल्याचे दिसून आले.

राज बन्सोड यांनी आरोप केला की जिल्हा रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ मोठ्या खरेदी आणि कागदी कामांमध्ये व्यस्त आहे. रुग्णांचे जीव वाचविण्यापेक्षा दिखाऊ व्यवस्थांवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून असलेला आपत्कालीन वार्डच जर घुसमटीचा अड्डा बनत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असेही त्यांनी म्हटले.

दोन दिवसांपूर्वी याच आपत्कालीन वार्डात एकाच दिवशी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वार्डातील ही असह्य आणि दमछाक करणारी परिस्थिती त्या मृत्यूंना कारणीभूत ठरली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती देण्यासाठी आणि परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राज बन्सोड यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकारी रुग्णालयात उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “रुग्णालयात एवढी गंभीर परिस्थिती असताना जबाबदार अधिकारीच अनुपस्थित असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील कथित भोंगळ आणि बेलगाम कारभारावरही आझाद समाज पक्षाने निशाणा साधला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णालयातील सुविधा सुरळीत कराव्यात, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राज बन्सोड यांनी दिला. “जिल्हा रुग्णालय रामभरोसे चालविण्याची मानसिकता प्रशासनाने त्वरित बदलली पाहिजे. रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळ आता सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here