गडचिरोली:गोंडवाना विश्वविद्यालय प्रशासनाने स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करून केलेल्या आरोपांवर सविस्तर खुलासा जारी केला आहे. काही वर्तमानपत्रांत “विद्यापीठ आहे की इवेंटबाजीचे केंद्र?” या आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताला उत्तर देताना प्रशासनाने संबंधित बातम्या एकांगी, चुकीच्या आणि तथ्यहीन असल्याचा दावा केला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले की, गोंडवाना विद्यापीठ हे केवळ कार्यक्रमांचे आयोजन करणारे केंद्र नसून विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेली संस्था आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा, वसतिगृह, मेस व्यवस्था, स्वच्छता आणि रखडलेल्या विकासकामांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रशासनाने सांगितले की, संबंधित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास असून त्यावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना सुरू आहेत.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गोंडवाना विद्यापीठाने गेल्या 14 वर्षांत उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सुरुवातीला केवळ 10 एकर जागेत सुरू झालेले विद्यापीठ आता 17 एकर परिसरात कार्यरत असून भविष्यातील विस्तारासाठी 180 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.
विद्यापीठात सुरुवातीला केवळ 5 पदव्युत्तर विभाग होते, त्यात वाढ करून आता 12 विभाग सुरू करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश, मोफत वसतिगृह सुविधा, “कमवा आणि शिका” योजना, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक लॅब आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले.
विद्यार्थ्यांची वाढती संख्या हे विद्यापीठाच्या कामाचे मोठे उदाहरण असल्याचे सांगताना प्रशासनाने स्पष्ट केले की, 2021-22 मध्ये 250 ते 300 विद्यार्थ्यांची संख्या असताना चालू शैक्षणिक वर्षात 1076 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (MERU) अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत प्रशासनाने सांगितले की, प्रशासकीय इमारत आणि परिसर विकासासाठी प्रस्ताव कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
विद्यापीठ प्रशासनाने “विद्यापीठ आपल्या गावात” उपक्रम, ग्रामसभा सक्षमीकरण प्रशिक्षण, स्टार्टअप आणि उद्योजकता विकास, संशोधन प्रोत्साहन योजना, ऑन-स्क्रीन मूल्यांकन केंद्र, तसेच रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यांचाही उल्लेख केला. लॉयड्स मेटल्ससोबतच्या करारातून स्थापन करण्यात आलेल्या “विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था”त सध्या 52 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही सांगण्यात आले.
प्रशासनाने असेही स्पष्ट केले की, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे केवळ “इवेंटबाजी”साठी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केले जातात.
शेवटी प्रशासनाने लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि समाजाकडून येणाऱ्या विधायक सूचनांचे स्वागत असल्याचे सांगत, अपूर्ण माहितीच्या आधारे विद्यापीठाची प्रतिमा मलिन करू नये, असे आवाहन केले आहे.




