Home ब्रेकिंग न्यूज “ऑपरेशन अंतिम प्रहार”चा दुहेरी दणका : ८ जहाल नक्षली अटकेत, ५ वरिष्ठ...

“ऑपरेशन अंतिम प्रहार”चा दुहेरी दणका : ८ जहाल नक्षली अटकेत, ५ वरिष्ठ नक्षल्यांचे आत्मसमर्पण…

0
97

 

गडचिरोलीत माओवादी चळवळीचा जवळपास पूर्णतः अंत; ५१ शस्त्रे, ६५ लाखांहून अधिक रोकड जप्त, १०२ लाखांच्या इनामी नक्षल्यांवर मोठी कारवाई

गडचिरोली, दि. १६ मे २०२६ :

गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीविरोधात गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने इतिहासातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक यशस्वी करत “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत तब्बल ८ जहाल आणि इनामी नक्षल्यांना अटक केली आहे. याचवेळी ५ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे.

या दुहेरी कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून, पोलिसांच्या अभिलेखावर आता एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अटक आणि आत्मसमर्पण झालेल्या एकूण १३ नक्षल्यांवर महाराष्ट्र शासनाने तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

८ जहाल नक्षली जेरबंद; फोदेवाडा चकमकीतील आरोपीही अटकेत

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाईत दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्य पदावरील नक्षल्यांना अटक केली.

विशेष म्हणजे, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असलेले नक्षलीही या कारवाईत पकडले गेले आहेत.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तेलंगणा राज्यातून ४, कुमनार येथून २ आणि नैताळा येथून २ अशा एकूण ८ नक्षल्यांना अटक करण्यात आली.

५१ अत्याधुनिक शस्त्रे आणि ६५ लाखांहून अधिक रोकड जप्त

अटक केलेल्या नक्षल्यांच्या चौकशीतून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा उघडकीस आणला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी जप्त केले :

२ एलएमजी रायफल,

४ एके-४७ रायफल,

४ एसएलआर रायफल,

३ इंसास रायफल,

.३०३ रायफल,

बीजीएल लाँचर

मोठ्या प्रमाणात मॅगझिन, डेटोनेटर आणि जिवंत काडतुसे

सह एकूण ५१ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली.

याशिवाय, घातपात आणि पोलीस मदत केंद्रांवर मोठे हल्ले करण्यासाठी साठवून ठेवलेली तब्बल ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली.

तेलंगणातून ४ नक्षली ताब्यात…

विशेष अभियान पथकाने विकाराबाद (तेलंगणा) येथील रुकमापूर रेल्वे स्टेशनवर कारवाई करत चार संशयित नक्षल्यांना ताब्यात घेतले.

त्यामध्ये :

जयराम मोंगे गावडे (पीपीसीएम), मुकेश उर्फ लच्छु अवलाम,विजय उर्फ मंगडू तामो,रजिता उर्फ शामबत्ती मडावी,यांचा समावेश आहे.हे चौघे फोदेवाडा चकमकीत सहभागी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

 

कुमनार गावातील शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी राजु उर्फ मंगडु वेको (डीव्हीसीएम), जन्नी उर्फ नगी येमला (पीपीसीएम) या दाम्पत्याला अटक केली.

त्यांच्याकडून एके-४७, .३०३ रायफल, बारा बोअर बंदूक आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.

चौकशीतून गुंडेनुर जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि ६३ लाख ८४ हजार रुपयांची रोकड उघडकीस आली.

 

नैताळा परिसरातील शोध मोहिमेत पोलिसांनी दोन महिला नक्षल्यांना पकडले : ज्योती उर्फ अकिला उर्फ समिता पोटावी (डीव्हीसीएम),आमती उर्फ आयती उर्फ संध्या पोडीयाम

त्यांच्याकडून एसएलआर, बारा बोअर आणि सिंगल शॉट रायफल जप्त करण्यात आली.

त्यांच्या चौकशीतून जंगल परिसरात लपवून ठेवलेले अतिरिक्त शस्त्रसाठेही हस्तगत करण्यात आले.

५ वरिष्ठ नक्षल्यांचे आत्मसमर्पण…

दरम्यान, पोलिसांच्या सातत्यपूर्ण अभियानामुळे आणि शासनाच्या पुनर्वसन योजनेमुळे ५ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये :

मधु उर्फ राकेश उर्फ बाजीराव वेळदा (डीव्हीसीएम), जिवन उर्फ जग्गु मडकाम (पीपीसीएम), रजनी उर्फ दुर्गा धुर्वा (एसीएम), मंगली रघु कुरसाम, लक्ष्मी डेंगा पुनेम, या पाचही नक्षल्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

“भूपती”च्या आत्मसमर्पणानंतर माओवादी चळवळीला मोठा धक्का…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिट ब्युरो सदस्य आणि सीपीआय (माओवादी) चे प्रवक्ते मल्लोजुला वेनुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यासह ६१ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते.

त्या घटनेनंतर संपूर्ण दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात १०६३ माओवादी सदस्यांनी ६३७ शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२०२५ पासून १३७ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी अभियानामुळे आणि शासनाच्या पुनर्वसन योजनेमुळे :

२०२२ पासून आतापर्यंत १७१ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले

तर २०२५ पासून आजपर्यंत १३७ नक्षल्यांनी शस्त्रे टाकली आहेत

आज आत्मसमर्पण केलेल्या ५ नक्षल्यांचाही त्यात समावेश आहे.

पुनर्वसनासाठी लाखोंची मदत…

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी लाखो रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

डीव्हीसीएम मधु वेळदा याला ८.५ लाख रुपये, तर इतर नक्षल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

पती-पत्नी असलेल्या मधु वेळदा आणि रजनी धुर्वा यांना अतिरिक्त १.५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच समूहाने आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त ४ लाख रुपयांचे प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.

गडचिरोलीत माओवादी चळवळ संपण्याच्या मार्गावर…

कधीकाळी गडचिरोलीच्या १० उपविभागांमध्ये सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे.

पोलीसांच्या मते, “ऑपरेशन अंतिम प्रहार”नंतर गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास पूर्णतः संपुष्टात आली असून, हा महाराष्ट्रातील नक्षलविरोधी लढ्यातील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here