Home विशेष गडचिरोलीत नगरपालिकेपेक्षा उद्योजक ठरला पुढे; हार्दिक बेकरीकडून १० रुपयांत २० लिटर शुद्ध...

गडचिरोलीत नगरपालिकेपेक्षा उद्योजक ठरला पुढे; हार्दिक बेकरीकडून १० रुपयांत २० लिटर शुद्ध आणि थंड पाण्याची सुविधा…

0
59

 

“जे काम नगरपालिका करू शकली नाही, ते एका युवा उद्योजकाने करून दाखवले”; नागरिकांकडून हार्दिक बेकरीचे कौतुक...

गडचिरोली : शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक नगरपालिकेची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र गडचिरोली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या समस्या, दूषित पाणी आणि अस्वच्छ व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त असताना, आता एका युवा उद्योजकाने पुढाकार घेत लोकांसाठी अत्यल्प दरात शुद्ध आणि थंड पाण्याची व्यवस्था उभी केली आहे.

गडचिरोली शहरातील कारगिल चौक परिसरात “हार्दिक बेकरी” चालविणाऱ्या युवा उद्योजकाने शुद्ध पिण्याच्या पाण्याची मशीन बसवून अवघ्या १० रुपयांत २० लिटर थंड आणि शुद्ध पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, ही सुविधा सुरू झाल्यानंतर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना कमी दरात थंड आणि शुद्ध पाणी मिळत असल्याने अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. “फक्त ५० पैसे प्रति लिटर दराने शुद्ध आणि थंड पाणी मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, या उपक्रमामुळे स्थानिक नगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची जबाबदारी असताना, आज एका खाजगी उद्योजकाला पुढाकार घ्यावा लागत आहे. “जे काम नगरपालिका करू शकली नाही, ते एका दुकानदाराने करून दाखवले,” अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय काळात गडचिरोली शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची टीका सातत्याने होत होती. अनेक भागांमध्ये दूषित पाणी नळांमधून येत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या. इतकेच नव्हे तर नियमित पाणीपुरवठाही वेळेवर होईल याची खात्री नागरिकांना राहिलेली नव्हती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहरातील गंभीर समस्यांपैकी एक बनला होता.

अशा परिस्थितीत हार्दिक बेकरीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. शुद्ध आणि थंड पाण्याची व्यवस्था अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांनी संबंधित युवा उद्योजकाचे कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, मागील चार महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक नगरपालिका निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांची व्यवस्था अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आता तरी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

यासोबतच, गडचिरोली शहरात विविध ठिकाणी “वॉटर एटीएम” योजना राबवून अत्यल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here