गडचिरोली : अक्षयतृतीया या शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महिला व बाल विकास विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या दिवशी कुठेही बालविवाह झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जनजागृतीसाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिर सूचना प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित…
बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर बालविवाह रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहभागी सर्वांवर कायदेशीर कारवाईचा इशारा…
बालविवाहात थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. यात धार्मिक गुरु, पंडित, विवाह मंडप मालक, लॉन संचालक, छायाचित्रकार, केटरिंग व्यावसायिक, बँड वाजंत्री यांचा समावेश असून, बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्यांवरही कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
शुभ मुहूर्ताचा गैरवापर रोखण्यावर भर..
अक्षयतृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र, काही ठिकाणी याच मुहूर्ताचा गैरफायदा घेत बालविवाह केल्याच्या घटना घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली असून, कोणताही बालविवाह होऊ नये यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत.
टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन…
नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा. देण्यात येणारी माहिती गोपनीय ठेवली जाईल व तत्काळ कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात १७ बालविवाह रोखण्यात यश…
जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी करत जिल्ह्यात १७ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. तसेच राज्यभरात मागील सहा वर्षांत ५,४२१ बालविवाह रोखण्यात आले असून ४०१ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ च्या कलम १६(१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बालविवाह ही केवळ सामाजिक कुप्रथा नसून दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.




