गडचिरोली :
गडचिरोली शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी चौक येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विशेष निर्बंध लागू केले होते. मात्र प्रत्यक्षात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होताना गंभीर त्रुटी उघड झाल्याने प्रशासन आणि पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत अधिकार वापरत १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्र १२ वाजेपर्यंत गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा आणि चामोर्शी मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अवजड तसेच हलक्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत इंदिरा गांधी चौक परिसरात हजारोंची गर्दी असतानाही या मार्गांवर अवजड वाहने, ट्रक आणि इतर वाहनांची सर्रास ये-जा सुरू असल्याचे चित्र दिसून आले. सुमारे १० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात अशा प्रकारे वाहतूक सुरू राहणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकले असते. यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, अत्यावश्यक सेवांना वगळता सर्व वाहतुकीवर निर्बंध असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. वाहतूक नियंत्रणात आलेल्या अडचणी, नियोजनातील त्रुटी किंवा समन्वयाचा अभाव—याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, या प्रकरणाची दखल घेत वाहतूक पोलिसांचे प्रभारी शरद मेश्राम यांना अवजड वाहने सुरूच का आहेत, याबाबत विचारणा केली. त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, कार्यक्रमासाठी पोलिस विभागाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोकुळ राज आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अनिकेत हिरडे हे स्वतः इंदिरा गांधी चौकात उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अरुण हेगडे यांच्या नेतृत्वात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही, ही बाबही महत्त्वाची ठरली.
तसेच, कार्यक्रमादरम्यान अचानक इंदिरा गांधी चौकातील हायमास्ट दिवे बंद झाल्याने काही काळ अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नगरसेवक सागर निंबोरकर यांनी तत्काळ संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने सुमारे १५ मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
याचबरोबर, काही मंडळांकडून मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टमचा वापर करण्यात आल्याने ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाही समोर आला. कर्कश आवाजामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
एकीकडे प्रशासनाने कायदेशीर आदेश काढून सुरक्षा व शिस्त राखण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी दिसून आल्याने संपूर्ण व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी अधिक काटेकोर नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




