कुणी कुणाला मानायचं, नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरच्या पवित्र दिक्षा भुमीवर बौद्ध धम्म स्विकारतांना आपल्या लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यात ” मी राम कृष्ण सह अन्य तेहतीस कोटी हिंदू देवी देवतांना आजपासून मानणारं नाही. ” अशीही एक प्रतिज्ञा आहे. 1956 पासून या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि घेतल्या जातात. यात गैर काय आहे? एकदा एखादी व्यक्ती मूळ धर्म सोडून दुसऱ्या धर्मात येते तेव्हा त्याला पुर्वीच्या रूढीपरंपरांचा नि देवीदेवतांचा त्याग करणं नितांत आवश्यक आहे!! यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही! दरवर्षी हजारो लोक अशोका विजया दशमीला
बौद्ध धम्माचा स्वीकार करतांना 22 प्रतिज्ञा घेतात यात हिंदू देवीदेवतांचा अपमान करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
1956 पासून प्रतिज्ञा घेणं सुरू आहे. आजपर्यंत कुणी काही म्हटलं नाही. मात्र दिल्ली येथील (राजेंद्रपाल गौतम उपस्थित असलेल्या ) एका कार्यक्रमात 22 प्रतिज्ञा घेण्याचा मोठा इश्यू बनविण्यात आला. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. शेवटी त्यांनी राजीनामा दिला. मला कळत नाही की यात मंत्रिमहोदयांचा काय कसूर आहे! प्रतिज्ञा घेणं हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग झाला. यात दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा संबंध येतोच कुठे?
शूद्र पायातून जन्मला म्हणता तेव्हा शुद्र जातीचा अपमान होत नाही काय? देशाचं रक्षण करतांना एक खालच्या जातीतील सैनिक शहिद होतो तेव्हा त्याचं प्रेत स्मशानात जाळू दिलं जात नाही ही या देशाची संस्कृती आहे. दलित समाजातील माणसाला आजही मंदिर प्रवेश करायला मज्जाव आहे मग तो मंत्री असो की राष्ट्रपती असो. तिकडे युपी.. बिहार.. राजस्थान आदी प्रदेशात मागासवर्गीय वराला घोडीवर बसू दिलं जात नाही. नुकतीच काही महिण्यापुर्वी एक घटना घडली जिथे एका शाळेकरी पोराला मटक्यातील पाणी प्याला म्हणून मरेपर्यंत मारण्यात आलं….. कुठे होतात तेव्हा तुम्ही? गृहमंत्री…. पंतप्रधान काही बोलत नाही अशा घटनांवर! बिहारचे ” मांझी ” असोत की माजी राष्ट्रपती “रामनाथ कोविद” असोत ते मागासवर्गीय असले तरी हिंदूच आहेत ना तुमचे! ते इतक्या मोठ्या पदावर असुनही मंदीर अपवित्र झालं म्हणून गंगाजलाने धुण्यात येतं. काय म्हणावं याला?
थोरा मोठ्यांना ही वागणूक मिळते तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल या देशात?
श्रीनिवास गेडाम, गडचिरोली