Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब दुबईत अडकल्याची चर्चा; प्रशासन अनभिज्ञ का?.

गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब दुबईत अडकल्याची चर्चा; प्रशासन अनभिज्ञ का?.

0
539

 

गडचिरोली : आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील ‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार हे कुटुंबियांसह दुबई येथे अडकल्याची माहिती विविध माध्यमांतून समोर आली आहे. मात्र या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने अनभिज्ञता दर्शविल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बुरेवार, पत्नी मेघा, मुलगी मयुरा आणि मुलगा नील हे २५ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. ५ मार्च २०२६ रोजी दुबई–हैदराबाद–नागपूर असा त्यांचा परतीचा प्रवास नियोजित होता. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे उड्डाणे रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुरेवार कुटुंब दुबईमध्ये अडकल्याची माहिती त्यांना विविध बातम्यांमधून मिळाली आहे. प्रशासनाकडून अद्याप बुरेवार कुटुंबाशी कोणताही थेट संपर्क झालेला नाही. “आमच्यापर्यंत आलेली माहिती ही बुरेवार कुटुंबीयांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार समजली आहे. अधिकृतरीत्या कुटुंबाकडून कोणतीही कळवणी प्राप्त झालेली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कुटुंबीय सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची अनौपचारिक माहिती समोर येत आहे. तथापि, तेथील युद्धजन्य वातावरणामुळे त्यांच्या परतीबाबत अनिश्चितता कायम आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले की, कुटुंबीयांकडून अधिकृत संपर्क साधल्यास राज्य व केंद्र शासनाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यात येईल. मात्र सध्या उपलब्ध माहिती ही केवळ माध्यमांतील वृत्ते आणि मित्रांकडून मिळालेल्या तपशीलावर आधारित असल्याने प्रशासन अधिकृतरीत्या अनभिज्ञ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here