Home राजकीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत भाजपकडून भर चौकात जाहीर निषेध…

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत भाजपकडून भर चौकात जाहीर निषेध…

0
235

 

गडचिरोली | दि. १५ फेब्रुवारी २०२६

भारतीय जनता पार्टी (भाजप) शहर व जिल्हा गडचिरोलीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज इंदिरा गांधी चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार डॉ. अशोक नेते व जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी केले. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोप केला की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत करण्यात आल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या महान कार्याची तुलना कोणाशीही करणे हा त्यांचा अवमान असल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सर्व धर्मांना समान न्याय दिला आणि स्वाभिमानाची प्रेरणा दिली. त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी करण्याचा किंवा इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न भाजपा सहन करणार नाही. भविष्यात अशा प्रकारची विधाने टाळावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संबंधित वक्तव्याबाबत काँग्रेसने जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात नगराध्यक्षा अँड. प्रणिता निंबोरकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती मुक्तेश्वर काटवे, हर्षल गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, नगरसेवक सागर निंबोरकर, शेखर आखाडे,नगरसेविका वर्षा शेडमाके, साक्षी बोलुवार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, युवा नेते घनश्याम वाढई, दिनेश नवघडे, दत्तू माकोडे, निखिल सुंदरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इंदिरा गांधी चौक परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी भाजपा सदैव कटिबद्ध राहील आणि त्यांच्या अवमानाविरोधात तीव्र लढा उभारला जाईल, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here