Home राजकीय नगरपालिकेच्या पाठीशी नेहमीच उभा राहीन – आमदार डॉ. मिलिंद नरोटे; लॉयड...

नगरपालिकेच्या पाठीशी नेहमीच उभा राहीन – आमदार डॉ. मिलिंद नरोटे; लॉयड मेटल कडून गडचिरोली नगरपालिकेला ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन…

0
285

 

गडचिरोली : शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी व नियमित व्हावी यासाठी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पुढाकार घेत लॉयड मेटल कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनीने आपल्या सीएसआर निधीतून गडचिरोली नगरपालिकेला अत्याधुनिक ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन प्रदान केली आहे.

या मशीनचे उद्घाटन आज सकाळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. अशोक नेते उपस्थित होते. तसेच लॉयड मेटल कंपनीचे अधिकारी श्री. नटराजन आणि कंपनीचे पब्लिक रिलेशन ऑफिसर गौरव लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छता व्यवस्थेला तांत्रिक बळ…

नगरपालिकेला ही ऑटोमॅटिक स्वच्छता मशीन मिळाल्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला तांत्रिक आधार मिळणार आहे. मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे आणि बाजारपेठ परिसरात नियमित यांत्रिक स्वच्छता शक्य होणार आहे. यामुळे नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या मशीनसाठी लागणारा इंधन खर्च, वाहनचालकाचा पगार तसेच दुरुस्ती व देखभाल खर्च लॉयड मेटल कंपनीकडूनच करण्यात येणार आहे. नगरपालिकेला केवळ मशीन कार्यान्वित ठेवण्याची व देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपालिकेवरील आर्थिक ताण कमी होणार आहे.

शहराच्या विकासासाठी माझीच कटिबद्धता…

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, “गडचिरोली नगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक मदत मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. नगरपालिकेच्या पाठीशी मी नेहमीच ठामपणे उभा राहीन. शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल.”

ते पुढे म्हणाले की, नगरपालिकेच्या कोणत्याही अडीअडचणीसाठी आपण तत्पर राहू व विकासकामांसाठी आवश्यक निधी आणण्याचा सातत्याने प्रयत्न करू.

भाजप ची जबाबदारी वाढली – माजी खासदार डॉ. अशोक नेते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. अशोक नेते यांनी सांगितले की, नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. शहरातील प्रत्येक भागात स्वच्छता व आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सर्व महायुतीचे नगरसेवक कटिबद्ध आहेत. कोणत्याही नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

आमदार डॉ. नरोटे यांच्या प्रयत्नांमुळे हे आधुनिक वाहन नगरपालिकेला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमामुळे गडचिरोली शहराच्या स्वच्छतेला नवे बळ मिळणार असून, शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here