गडचिरोली:
गडचिरोली शहरात भीक मागण्याच्या अमानुष प्रकारावर एकदा कारवाई होऊनही संबंधित महिला पुन्हा रस्त्यावर लहान बालकांना घेऊन भीक मागताना दिसून आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली असून, “केवळ दिखाऊ कारवाई नव्हे, तर ठोस आणि कठोर पावले उचलावीत” अशी मागणी जोर धरत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाने एका गरोदर महिलेसह चार महिलांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातील बालकांना महिला बालकल्याण समितीसमोर सादर केले होते. त्यावेळी संबंधित महिलांकडून “यापुढे भीक मागणार नाही” असे लेखी आश्वासन घेऊन त्यांना सोडण्यात आले होते. मात्र, त्या महिला पुन्हा त्याच पद्धतीने शहरातील विविध ठिकाणी भीक मागताना आढळल्याने ही कारवाई केवळ औपचारिक ठरल्याची टीका होत आहे.
शहरात अनेक ठिकाणी काही महिला लहान मुलांना खांद्यावर झोपवून दिवसभर भीक मागताना दिसतात. या मुलांना शांत ठेवण्यासाठी नशायुक्त पदार्थ दिला जात असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या माध्यमातून सहानुभूती मिळवत मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतही या महिला आणि लहान बालकांचा जीव धोक्यात घालून भीक मागण्याचा प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा महिलांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे, तसेच बालकांचे संरक्षण सुनिश्चित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असतानाही वारंवार हा प्रकार सुरू असल्यामुळे यामागे एखादे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी महिला व बालकल्याण विभागाला इशारा देत सांगितले आहे की, थातूरमातूर कारवाई थांबवून कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी. तसेच संबंधित महिलांसाठी पर्यायी उपजीविका, निवारा आणि समुपदेशनाची प्रभावी व्यवस्था करावी, जेणेकरून त्या पुन्हा भीक मागण्याकडे वळणार नाहीत.
गडचिरोलीत बालकांचा वापर करून भीक मागण्याच्या या गंभीर प्रकारावर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
Home भ्रष्टाचार कारवाईनंतरही पुन्हा रस्त्यावर भीक मागताना महिला; गडचिरोलीत कठोर कारवाईची जोरदार मागणी…




