आयुष्यात कुठली माणसं यशस्वी होतात..??

0
179

आयुष्यात कुठली माणसं यशस्वी होतात? ढोर मेहनत करणारी…. हुशार की अजून दुसरं काही? ढोर मेहनत करणारी माणसं यशस्वी झाली असती तर आपला अन्नदाता शेतकरी आणि मजूर सर्वात आधी आधी मालामाल झाला असता ! रात्रभर जागून अभ्यास करणारा विद्यार्थी वर्गात प्रथम क्रमांकाने पास झाला असता! हुशारीचं म्हणाल तर आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार असलेले प्रायमरी शाळेतील आपले वर्ग मित्र पदवीधर तर सोडाच साधे मॅट्रिक पास होऊ शकलेले नाहीत! गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्यावर अनेकांना नोकरीची लॉटरी लागली पण मी अव्वल नंबर प्राप्त करूनही बेकार होऊन अनेक वर्षे फिरत होतो. जिल्ह्यातील युवकांना संधी द्या म्हणून कलेक्टरला वारंवार भेटणारे आम्हीच होतो! सुमार गुणवत्ता असलेले लोक नोकरीत लागले मी मात्र असाच भटकत राहिलो. सेवयोजन…. समाजकल्याण…. कास्ट्राईबचं आणि इतर अनेक कार्ड असुनही एकाकडूनही कॉल आला नाही. आता याला काय म्हणणार? मीच नेमका त्यांच्या नजरेतून कां सुटावा हे अजुनही कळलेलं नाही. कॉल आला असता तर खूप आधी अंट्रेंड टीचर म्हणून लागलो असतो. लवकर लग्न करून मनाजोगा जीवन साथीदार निवडता आला असता. दोन्ही मुलं आज स्वतःच्या पायावर उभी असती. घर खूप आधी बांधून झालं असतं. सेवानिवृत्त होईपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडता आल्या असत्या! पारिवारिक असंतुष्टी दिसली नसती! असो…. या जरतरच्या गोष्टी झाल्या. याला नशीब…. प्रारब्ध वैगेरे म्हणणार नाही कारण तसं म्हटलं तर देव नि दैववाद आला! लोक मला उगीच फाडून खातील!

 

सांगायचा मुद्दा हाच की, केवळ मेहनत करून किंवा हुशार असून यश संपादन करता येत नाही. यशस्वी होण्यासाठी तारतम्य बुद्धी आणि व्यवहारिकता आणि सं धीच सोनं करण्यासाठी धूर्तपणा…समज नि आत्मविश्वास लागतो! खूप मोठी रांग लागलेली आहे. धूर्त असलेली व्यक्ती लाईनीत उभी राहून उगीच वेळ वाया घालवणार नाही. सदर व्यक्ती धक्का देऊन पुढे जाईल किंवा वेगळीच शक्कल लढवून काम पुर्णत्वास नेईल! परीक्षेत अव्वल येणं वेगळं आणि जीवनात यशस्वी होणं वेगळं! आयुष्याचा सफर (प्रवास ) नीट करायचा असेल तर हुशारी लागते. आत्मविश्वास लागतो. शाळेत तुम्ही किती हुशार होता याला इथे काडीमात्र महत्व नाही. मनात प्रचंड आत्मविश्वास असेल तर शिक्षण… पैसा आदी नसतांनाही खूप उंच भरारी घेता येते हे अनुभवातून सांगतो.

जी.श्रीनिवास यांच्या लेखणीतून…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here