आरमोरी (प्रतिनिधी) :
येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक प्रश्न आरमोरीकरांच्या मनात ठाशीवपणे उपस्थित होत आहे — “आरमोरीमध्ये काँग्रेसचं भाजप आहे, तर मूळ भाजप गेलं कुठे?” स्थानिक जनतेत वाढत चाललेली ही खदखद आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.
२०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाचा वेगाने बदल घडवून आणणारी एक मोठी घटना म्हणजे, जिल्ह्यातील एक ख्यातनाम “सहकार महर्षी” यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश. सहकार क्षेत्रातील जवळपास सर्व बँका, संस्था व अदृश्य उद्योगांवर त्यांची मजबूत पकड असल्यामुळे, कुठलीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी चर्चा त्या काळापासून सुरू आहे.
गेल्या दहा वर्षांपासून बाजार समित्या, सहकारी बँका, विविध संस्था या सर्व क्षेत्रांवर “आम्ही करतो तेच कायदा” या धर्तीवर कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. आदिवासी बहुल व मर्यादित साक्षरतेच्या जिल्ह्यात सहकाराची ही जाळी इतकी मजबूत करण्यात आली की आजही त्यांचा प्रभाव सर्व पातळ्यांवर जाणवतो.
विधानसभा निवडणुकीतील खेळी अजूनही चर्चेत…
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना भाजपा तिकीट देण्यात यावे यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता. मात्र पक्षाने तिकीट नाकारताच, महर्षींच्या नाराजीचे पडसाद संपूर्ण निवडणुकीत उमटले.
अनेक कार्यकर्त्यांच्या मते, “महर्षींच्या राजकीय खेळामुळेच भाजपा उमेदवाराचा पराभव झाला,” अशी चर्चा आजही थांबलेली नाही.
आता नगराध्यक्ष पदावरही तशीच योजना?
आता नगरपरिषद निवडणुकीत हा खेळ आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपचा सक्रिय सदस्य नसलेल्या व्यक्तीस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू असून, यामागे पुन्हा एकदा महर्षींचाच प्रभाव असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.
स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, “दशकभरापासून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते बाजूला; आणि भाजपमध्ये किमान सभासदही नसलेल्यांना उमेदवारी? हा भाजप आहे की काँग्रेस-शैलीतील सहकार राजकारण?” असा प्रश्न खुलेपणे विचारला जात आहे.
जनतेचा थेट सवाल : ‘भाजप कुठे गायब?’
आरमोरी नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सर्व घडत असताना सामान्य नागरिकांकडून सरळ प्रश्न उपस्थित होत आहे —
“आरमोरीत दिसतं ते काँग्रेसचं सहकारराज… मग मूळ भाजपचं धोरण, नेतृत्व, कार्यकर्त्यांची कदर कुठे?”
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत ही नाराजी पोहोचत आहे. आगामी काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना नेतृत्व कशा हाताळते, आणि महर्षींच्या राजकीय खेळीला कशाप्रकारे उत्तर दिले जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




